
दापोली- दापोली तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई अनेक भागात निर्माण झाली आहे. त्यामुळे दापोली येथील तामसतीर्थ गावातील भंडारवाडा कोळीवाडयाला पाणी पुरवठा करण्यासाठी दापोली पंचायत समितीकडून मंगळवारी पहिला पाण्याचा टॅंकर पाठविण्यात आला. पाऊस पडेपर्यंत तामसतीर्थला पाण्याचा टॅंकर पुरवावा लागणार आहे. शिवाय तीव्र पाणीटंचाईमुळे आणखी काही गावांना टॅंकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागणार असल्याचे सांगण्यात आले.
दापोली तालूक्यातील तामसतीर्थ हे गाव तांबडया समुद्रासाठी सुप्रसिध्द असे गाव आहे. तामसतीर्थ गावात लालबाग, चिपळूणकरवाडी, झगडेवाडी, मुकादम वाडी आणि भंडारवाडा कोळीवाडा अशा वाडया आहेत. त्यापैकी भंडारवाडा कोळीवाडा हा कायमच पाणी टंचाईग्रस्त भाग आहे. समुद्राच्या काठावर वसलेले तामसतीर्थ तांबडया पाण्याच्या समुद्रासाठी प्रसिध्द असल्याने दापोली तालूकाच नव्हे तर जिल्हाभरातून या तामसतीर्थ समुद्राच्या पाण्यात आपल्या धार्मिक विधी करण्यासाठी लोक येथे येत असतात.
पर्यटनदृष्टया हे महत्वाचे असे ठिकाण असले तरी पाणी टंचाईचा परिणाम हा पर्यटन व्यवसायवर होताना दिसत आहे. या गावासाठी खासकरून स्वतंत्र पाणी योजना करून दरवर्षीचा पाणी टंचाईचा प्रश्न निकाली काढणे आवश्यक आहे. ग्रामस्थांच्या मागणी अर्जाची तातडीने दखल घेवून पंचायत समिती दापोलीने तामसतीर्थ गावाला पाण्याच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.