
नेरळ ता. सुमित सुनिल क्षीरसागर- नेरळ ग्रामपंचायत हद्दीत सध्या पाणीबाणी सुरु आहे. नेरळ ग्रामपंचायतच्या जुन्या पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र नवीन वाढीव पाणी योजना मंजूर होऊन तिचे काम सुरु असल्याने पाणी पुरवठ्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. अशात मोहचीवाडी, आदिवासी वाड्या, पायरमाळ आदी भागात पूर्वीपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये खदखद निर्माण झाली होती. अशात नेरळ ग्रामपंचायतीने राजेंद्रगुरूनगर भागासाठी पूर्वीची २ इंची लाईन ऐवजी थेट ४ इंची लाईन टाकायला घेतली. २० जूनच्या मध्यरात्री हे काम करायला घेतल्याने नागरिकांनी याबाबत आक्षेप नोंदवत आज २१ जून रोजी मोहचीवाडी, आदिवासी वाड्या, पायरमाळ आदी भागातील नागरिकांनी आक्रमक होत नेरळ ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढत ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांना धारेवर धरले. दरम्यान नागरिकांना विचारात घेऊन यातून सुवर्णमध्य काढला जाईल असे आश्वासन उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी देऊन अखेर सर्वाना शांत केले.




नेरळ ग्रामपंचायतसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने १९९८ मध्ये तयार केलेली नळपाणी योजना ३६ हजार लोकसंख्येसाठी बनविण्यात आली होती. मात्र तरीदेखील आजच्या घडीला नेरळ ग्रामपंचायतच्या अर्ध्या भागाला पाणी कमी दाबाने जात आहे. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकीकरण देखील वाढले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात ग्रामस्थाना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यातच उन्हाळ्याच्या काळात नदीचे पाणी पात्र ही आटत असल्याने याचा परिणाम थेट पाणी टंचाईवर होत आहे. अशात नव्या वाढीव पाणी योजनेचे काम सुरु झाले असल्याने त्याचा परिणाम पाणी सध्याच्या पाणी योजनेवर होत आहे. त्यामुळे राजेंद्रगुरूनगर भागात पाणी मिळण्यासाठी तेथील सदस्य संतोष शिंगाडे व गीतांजली देशमुख यांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करत १५ वित्त आयोगातून वार्ड क्रमांक ५ मध्ये अंतरंगात पाईपलाईन तयार करणे आराखड्यात मंजूर करून घेतले. तर यासाठी ४ लाख रुपयांची तरतूद करत अमित मेहंदळे यांचे घरापासून ते साईधाम सोसायटीपर्यंत पाईप लाईन टाकण्याचे काम २० जूनच्या रात्री सुरु केले. मुळात हि पाईपलाईन हि मुख्य पाईपलाईनला जोडलेली आहे. तर पूर्वीची पाईपलाईन हि २ इंची होती मात्र नवीन लाईन टाकताना पाईपलाईन हि चार इंची करण्यात आली. बोर्ले येथून येणारी मुख्य पाईप लाईन हि मोहचीवाडी येथे असलेल्या पाण्याच्या टाकीत सोडण्यात येते. त्याच लाईनवर गेल्या काही वर्षात अनेक ठिकाणी टॅप मारत असंख्य जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे मोहचीवाडी येथील पाण्याची टाकी भरण्यास उशीर होऊन परिणामी मोहचीवाडी, परिसरात पाण्यासाठी ओरड होते. दरम्यान राजेंद्रगुरुनगर भागात ४ इंची पाईपलाईन टाकल्याने त्याचा थेट परिणाम मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीवर होऊन नागरिकांना पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होणार असल्याने याबाबत मोहचीवाडी येथील नागरिक आक्रमक होत त्यांनी आज दिनांक २१ जून रोजी थेट नेरळ ग्रामपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला. त्यामुळे सर्वांना वरच्या सभागृहात बसण्याची व्यवस्था करत सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर, सदस्या श्रद्धा कराळे, शिवली पोतदार, जयश्री मानकामे, उमा खडे, गीतांजली देशमुख, अरूणा पवार, संतोष शिंगाडे, राजेंद्र लोभी, धर्मानंद गायकवाड, प्रथमेश मोरे ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर हे उपस्थित होत ते ग्रामस्थांना सामोरे गेले.
यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भगवान चव्हाण, व काशिनाथ ठमके यांनी ग्रामपंचायतीला आपले म्हणणे निवेदनातून दिले.तर मागील वेळेस खांड्यातील एका बिल्डरला पाणी देण्यासाठी मोहचीवाडी येथील पाण्याच्या टाकीतून रस्ता खोदून पाईपलाईन टाकली जात होती. त्यावेळी ग्रामस्थांनी ती लाईन उखडून टाकली. तर रस्ता तसाच ठेवण्यात आला त्याचा त्रास मोहचीवाडी ग्रामस्थांना झाला. तेव्हा प्रत्येक वेळी मोहाच्या वाडीला वेठीस का धरले जाते ? कुणीही उठून हवे तसे कनेक्शन फिरवतो, आता जे काम सुरू केलं ते कुणाला विचारून केले, हे काम करताना त्याचा परिणाम मोहचीवाडी ग्रामस्थावर होणार आहे तेव्हा ग्रामस्थांना विश्वासात घेणे ग्रामपंचायतीला जरुरीचे वाटले नाही का असा प्रश्नांचा भडीमार चव्हाण यांनी केला. तर १ नंबरच्या वार्ड मध्ये ज्या ७ वाड्या आहेत. त्या वाड्यांना मोहाची वाडी येथे पाण्याची टाकीतुन पाणी जाते.तरी मेन लाईनवरून पाइपलाइन घेणे खेदजनक आहे. सध्या जे काम सुरू आहे ते कोणतीही पूर्वसूचना न देता हे कसं सुरू केलं, प्रत्येक वेळी वाडयांना गृहीत धरले जाते मात्र या प्रकरणाचा योग्य निकाल न लावल्यास पुढील मोर्चा हा वाड्यांचा असेल असा सुनील पारधी यांनी ग्रामपंचायतीला दिला. तर चिंधू बाबरे यांनी वारंवार मोहचीवाडी येथील पाणी आमच्या हक्काचे आहे आणि ते पळवले जाते असा आरोप करत ग्रामसेवक यांना जाब विचारला. यासह प्रतीक चव्हाण, अमोल चव्हाण, गजू झांजे, चिंधू बाबरे, आदींनी ग्रामपंचायतीला धारेवर धरले. यामुळे काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे हे काम थांबवण्यात आले आहे. तसेच कुणाचेही हक्काचे पाणी पळवले जाणार नाही. याउलट सर्वांच्या सहकार्याने यातून सुवर्णमध्य आपण मिळून काढू असे आश्वसन उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी दिल्याने ग्रामस्थ शांत बसले. मात्र यावर निर्णय होत नाही तोवर ४ इंची पाईपलाईन जोडली जाऊ नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली त्यावर ती लाईन जोडली जाणार नसल्याचे म्हसकर यांनी बोलून ग्रामस्थांना आश्वस्त केले.
गेले अनेक वर्षे आम्ही मोहचीवाडी ग्रामस्थ पाण्याच्या समस्येने ग्रस्त आहोत. मात्र तरीही आम्ही ग्रामस्थ समजूतदार असल्याने काही बोलत नाही कि ग्रामपंचायतीला घेराव घालत नाही. परंतु आम्हाला त्यामुळे गृहीत धरले जाते. पाणी येत नसल्याने दुसरे कनेक्शन घ्या असे सांगितले गेले. आम्ही पैसे घालवून दुसरे कनेक्शन घेतले तेव्हा सुरवातीला पाणी मिळाले मात्र त्यानंतर पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी अवस्था आहे. आता पाणी आलं कि हंडे घेऊन धावपळ सुरु होते. स्वतःच्या घरात नळ जोडणी असताना देखील कोणाच्या नळाला पाणी आहे हे पाहून तिथे रांग लावली जाते अशी स्थिती मोहचीवाडी भागात आहे. तरी आम्ही ग्रामस्थ पाणी बिल वेळेवर भरतो. मात्र आता आम्हला पाणी मिळणार नसेल तर आम्ही ग्रामपंचायतीला स्वस्थ बसू देणार नाही. ग्रामपंचायतीने कोणाला पाणी द्यायचं तो त्यांचा प्रश्न आहे पण पहिल्यांदा मोहचीवाडी येथे पाण्याची सोया करा.
: वर्षा बोराडे, महिला ग्रामस्थ
बोर्ले येथून में लाईनने मोहचीवाडी येथील टाकीमध्ये पाणी सोडले जाते. मात्र सदर पाइपलाइनला अनेक ठिकाणी टॅप मारून कनेक्शन देण्यात आले आहेत. त्यामुळे मोहचीवाडी येथील टाकीमध्ये पाणी पडतच नाही. पूर्वी ३ तासात भरणारी टाकी आता ८ तास होऊन देखील पूर्ण भरत नाही. त्यामुळे मोहचीवाडी येथील ग्रामस्थांना करंगळीपेक्षा लहान धार पाण्याची येते तीही काही वेळच मग नागरिकांनी काम करायची कशी ? तर अनेकदा मोहचीवाडी टाकीतून पाणी पळवण्याचा घाट घालण्यात येतो मात्र आम्हा ग्रामस्थांना विचारात घेतले जात नाही. नेरळमध्ये जे ५० वर्ष राहतात ते पान्यासापासून वंचित आहेत मात्र नवीन येणाऱ्यांना पाण्याची सोया करण्यात येते. कुणाला पाणी द्यायचं हा प्रश्न ग्रामपंचायतीचा असला तरी ग्रामस्थांना पाण्यापासून वंचित ठेवता येणार नाही. यापुढे असे चालणार नाही
: भगवान चव्हाण, ग्रामस्थ
नेरळ कर्जत रस्त्यालगत जे राजेंद्रगुरुनगर भागासाठी पाण्याची लाईन टाकली जात होती. ते काम थांबवण्यात आले आहे. तसेच यावर ग्रामस्थांसोबत चर्चा करून काय तो निर्णय घेतला जाईल. तोवर तिथे कोणतेही काम होणार नाही. ग्रामस्थांना सोबत घेऊन यावर काय तो सुवर्णमध्य काढू. यासह नळाच्या लाईनला मोटार लावल्यामुळे अनेक भागात कमी दाबाने पाणी येते यावर ग्रामपंचायतीकडून मोहीम राबवण्यात येऊन मोटार मिळाल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे.
मंगेश म्हसकर, उपसरपंच नेरळ ग्रामपंचायत