
संगमेश्वर :अर्चिता कोकाटे/ नावडी- एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प देवरूख संगमेश्वर अंतर्गत रामपेठ येथील अंगणवाडीच्या सेविका पल्लवी शेरे व मदतनीस शीतल अंब्रे यांनी आषाढी एकादशी निमित्त पर्वावर बालकांचा वारकरी दिंडी उपक्रम घेतला.
श्री विठ्ठल, रखुमाई, जनाबाई, तुकाराम महाराज अशा महाराष्ट्राला संत परंपरा असलेल्या महान संतांच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या. डोक्यावर तुळशी वृंदावन तर काहींच्या हातात टाळ, डोक्यावर सफेद टोपी व गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळाला चंदनाचा टिळा लावलेले बालकरुपी संत मांदियाळी व त्यांचे पालक या दिंडीत समाविष्ट झाले होते.



रामपेठ अंगणवाडी ते गणपती मंदिर नावडी या दरम्यान काढलेल्या वारकरी दिंडीत जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल तसेच संत ज्ञानोबा, संत तुकाराम महाराज यांच्या जयघोषानी आसमंत दुमदुमले. श्री गणपती मंदिरात प्रवेश केल्यानंतर गोल फेर धरून जय जय विठ्ठल रखुमाई असा गजर करण्यात आला.
नावडी सरपंच सौ. प्रज्ञा कोळवणकर यांनी या कार्यक्रमास भेट देऊन बालकांना शुभेच्छा व्यक्त केल्या. राधा संकेत शिरगावकर यांच्या वतीने मुलांना फळ वाटप करण्यात आले.
महिला पालकांनी यावेळी फुगड्यांचा आनंद लुटला. रामपेठ अंगणवाडीच्या वतीने बालकांना खाऊ वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर यांनी उपक्रमास भेट दिली. सदर कार्यक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
बालकांच्या आनंदात रममाण झालेले पालक दिसले. त्यानंतर गणपती मंदिर ते श्रीराम मंदिर रामपेठ अशी दिंडी काढण्यात आली . श्रीराम मंदिरात सामूहिक भजन करण्यात आले. पुन्हा अंगणवाडीत जाऊन कार्यक्रमाची सांगता सेविका पल्लवी शेरे व मदतनीस शितल अंब्रे यांनी पालकांचे व मान्यवरांचे आभार मानून केली. कैलास ( बाळा )चोचे यांस कडून राम मंदिरात खाऊ वाटप करण्यात आले.