लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यात आज (13 मे) देशातील 10 राज्यांमधील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, अहमदनगर, पुणे, शिरुर, शिर्डी, बीड आणि औरंगाबाद या 11 मतदारसंघांचा समावेश आहे.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) चौथ्या टप्प्यासाठी आज (13 मे) मतदानाची रणधुमाळी पार पडणार आहे. एकूण पाच टप्प्यातील निवडणुकांपैकी राज्यातील तीन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तर आज राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघातील चौथ्या टप्प्याच्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये जळगाव, नंदुरबार, रावेर, जालना, मावळ, औरंगाबाद, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघाचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होणार असल्यानं सर्वांचंच लक्ष याकडं लागलंय.
🔹️दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला….
राज्यात रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत खैरे, अमोल कोल्हे, हिना गावीत, रक्षा खडसे हे दिग्गज नेते यंदा मैदानात आहेत. तसंच पुणे मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे यांच्यात तिरंगी लढत आहे. शिरूर येथे दोन्ही राष्ट्रवादी आमने-सामने असून अजित पवार गटाकडून शिवाजीराव पाटील आणि शरद पवार गटाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे रिंगणात आहेत. त्यामुळं या लढतीत कोण बाजी मारेल हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.
🔹️यांच्यात होणार लढत…
▪️पुणे : मुरलीधर मोहोळ (भाजपा) विरुद्ध रविंद्र धंगेकर (काँग्रेस)
▪️बीड : पंकजा मुंडे (भाजपा) विरुद्ध बजरंग सोनावणे (शरद पवार गट)
▪️शिरुर : अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट)
▪️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : संदिपान भुमरे (शिंदे गट), चंद्रकांत खैरे (शिवसेना ठाकरे गट), इम्तियाज जलील (एआयएमआयएम)
▪️जालना : रावसाहेब दानवे (भाजपा) विरुद्ध कल्याण काळे (काँग्रेस)
▪️अहमदनगर : सुजय विखे-पाटील (भाजपा) विरुद्ध नीलेश लंके (शरद पवार गट)
▪️मावळ : श्रीरंग बारणे (शिंदे गट) विरुद्ध संजोग वाघेरे (ठाकरे गट)
▪️शिर्डी : सदाशिव लोखंडे (शिंदे गट), भाऊसाहेब वाकचौरे (ठाकरे गट), उत्कर्षा रुपवते (वंचित बहुजन आघाडी)
▪️रावेर : रक्षा खडसे (भाजपा) विरुद्ध श्रीराम पाटील (शरद पवार गट )
▪️जळगाव : स्मिता वाघ (भाजपा) विरुद्ध करण पवार (ठाकरे गट)
▪️नंदुरबार : हिना गावित (भाजपा) विरुद्ध गोवल पाडवी (काँग्रेस)
🔹️10 राज्यांतील 96 मतदारसंघात होणार मतदान…
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी 10 राज्यांतील 96 मतदारसंघात मतदान होणार आहे. यात आंध्र प्रदेश (25), बिहार (5), जम्मू आणि काश्मीर (1), झारखंड (4), मध्य प्रदेश (8), महाराष्ट्र (11), ओडिशा (4), तेलंगणा (17), उत्तर प्रदेश (13), आणि पश्चिम बंगाल (8) जागांवर मतदान पार पडणार आहे.