
*चिपळूण-* कोकणातील सांस्कृतिक वैभवाची ओळख असलेल्या चिपळूण शहरात अलीकडेच ‘निऑन इव्हेंट’च्या नावाखाली नाईट लाइफ अर्थात पब संस्कृतीच्या सुरूवातीची चर्चा रंगली आहे. धवल नगरी परिसरातील एका इव्हेंट संदर्भात सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या चर्चेला अधिक उधाण आले आहे.
https://www.instagram.com/reel/DKUmAk0MAJE/?igsh=MW81ODY1Z3V1dGVnbA==
व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये युवक-युवती बेधुंदपणे नाचताना दिसत आहेत. ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादा पार करणारे संगीत, नृत्य आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हे इव्हेंट पब संस्कृतीचे संकेत देतात, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे. विशेष म्हणजे, १७ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या अशाच एका इव्हेंटमध्ये कपल आणि महिला सहभागींसाठी विनामूल्य प्रवेश देण्यात आल्याची माहिती मिळते. रात्री ८ ते १ वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता.
चिपळूण ही केवळ कोकणच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक नकाशावर एक महत्वाची ओळख असलेली नगरी आहे. येथे अनेक साहित्य संमेलने, नाट्यगृहे, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक परंपरांचा सन्मान आहे. अशा पार्श्वभूमीवर शहरातच नाईट लाइफचे अवतार उभे राहात असल्याच्या चर्चा शहरात दबक्या आवाजात सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर अनेक ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, पालक आणि सामाजिक कार्यकर्ते यामागील हेतू, युवकांवरील परिणाम आणि कायद्याच्या चौकटीतील वैधता यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. काहींच्या मते, अशा इव्हेंट्समुळे तरुण पिढी दिशाभूल होण्याचा धोका आहे, तर काहींना ही आधुनिकतेची आणि खुलेपणाची गरज वाटते.
स्थानिक प्रशासनाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरीही सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ, पबसदृश वातावरण आणि रात्रीपर्यंत सुरू असणारे इव्हेंट यामुळे धवल नगरी परिसर आता शहरातील लक्षवेधी चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, अशा इव्हेंट्सना परवानगी होती का?, पोलिस प्रशासनास याची माहिती होती का?, आणि या गोष्टी चिपळूणच्या सांस्कृतिक आणि सामाजिक ढाच्यावर काय परिणाम करतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.