बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बक्सर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेदेखील उपस्थित होते.
बिहारमध्ये भाजपा आणि जदयू हे पक्ष मिळून सरकार स्थापन करू शकतात. अर्थात जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवली जात आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाशी आघाडी करत राज्यात सरकार स्थापन केलं होतं. परंतु, नितीश कुमार आता या आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी हातमिळवणी करणार असल्याचं बोललं जात आहे. येत्या रविवारी, २८ जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल, अशी बातमी राजकीय सूत्रांच्या हवाल्याने द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यांच्याबरोबर आणखी एका उपमुख्यमंत्र्याची नेमणूक केली जाऊ शकते.
बिहारबाबत एका बाजूला भाजपा हायकमांडची दिल्लीत खलबतं सुरू आहेत. दरम्यान, भाजपाचे प्रभारी विनोद तावडे पाटण्यात दाखल झाले आहेत. तावडे बिहारला गेल्यामुळे मोठ्या राजकीय बदलांबाबत चर्चा सुरू झाली आहे. विनोद तावडे पाटण्यात भाजपा नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापन करणे आणि मंत्रिपदांबाबत चर्चा होईल असं सांगितलं जात आहे. ही बैठक पूर्णपणे राज्यातील घडामोडींवर केंद्रीत असेल. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही चर्चा होईल.
दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एका कार्यक्रमानिमित्त बक्सर येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर भाजपाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री अश्विनी चौबेदेखील उपस्थित होते. तर विनोद तावडे पाटण्यात दाखल झाले आहेत. तावडे यांनी पाटण्यात पोहोचल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि त्यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’वर टीका केली. तावडे म्हणाले, ही भारत जोडो नव्हे भारत तोडो यात्रा आहे.
भारतीय जनता पार्टीने शनिवारी (२७ जानेवारी) सकाळी विनोद तावडे यांची बिहारचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केली आहे.
पाटण्यात येण्याचं कारण विचारल्यानंतर विनोद तावडे म्हणाले, बिहार भाजपाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्ष कार्यकारिणीतले सदस्य, आमदार, खासदार आणि इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित असतील. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही बैठक बोलावण्यात आली आहे. प्रामुख्याने यावेळी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीबाबत चर्चा होईल.