बीड- शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. सचिन मेटे असे त्यांच्या पुतण्याचे नाव असून बीडच्या राजेगाव परिसरात त्याने गळफास घेत आपले आयुष्य संपवले आहे. या आत्महत्येमागील कारण समोर आले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचे भाऊ त्रिंबक मेटे यांचा मुलगा सचिन मेटे याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील मेटे यांच्या राहत्या गावी ही घटना घडली आहे. सचिन मेटे याने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. विनायक मेटे यांचं निधन झालेलं असतानाच आता सचिन मेटे याने आत्महत्या केल्याने मेटे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळं बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचं १४ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कार अपघातात निधन झालं होतं. दोन महिन्यांपूर्वीच मेटे कुटुंबियांनी विनायक मेटे यांचा स्मृतीदिन केला होता. त्यानंतर आता सचिन मेटे याने आत्महत्या केल्याने मेटे कुटुंबियांत शोक व्यक्त केला जात आहे. सचिन मेटे याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं?, याचा तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. सचिनच्या आत्महत्येमागे मानसिक तणावाचं कारण आहे की अन्य कारणं आहेत? याची देखील चौकशी बीड पोलिसांकडून करण्यात येणार आहे.