राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीकडुन  उध्दव सेनेचे विनय गुरव बिनविरोध !…

Spread the love

तर स्विकृत नगरसेवक पदी महाविकास आघाडीकडुन पत्रकार महेश शिवलकर तर महायुतीकडुन सुभाष बाकळकर यांची निवड..

राजापूर / प्रतिनिधी – राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक विनय गुरव यांची बिनविरोध निवड पार पडली. या निवडणुकीत विरोधी महायुतीच्या वतीने अर्ज न सादर करण्यात आल्याने उपनगराध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. तर स्वीकृत सदस्य म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार महेश शिवलकर यांची तर महायुतीच्या वतीने माजी नगरसेवक सुभाष शाम बाकाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी राजापूर नगर परिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी महाविकास आघाडी विरुध्द महायुती असा सरळ सामना झाला होता. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांनी प्रत्येकी दहा जागा जिंकल्या . मात्र अटीतटीच्या झालेल्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार माजी नगराध्यक्षा आणि माजी विधानपरिषद सदस्या ऍड हुस्नबानू खलिफे या विजयी झाल्या होत्या.
राजापूर नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह दहा अशा एकूण अकरा जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे.


राजापूर नगर परिषदेतील सत्तास्पर्धा समाप्त होताच उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत सदस्य कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. पालिकेतील सत्ता बळ लक्षात घेता महाविकास आघाडीसह महायुतीला प्रत्येकी एकेक स्वीकृत सदस्य मिळणार हे निश्चित होते. शिवाय पालिकेतील संख्यबळ पहाता महाविकास आघाडीचाच उपगराध्यक्ष होणार हे देखील नक्की होते. महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पद काँग्रेसकडे असल्याने  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला उपनगराध्यक्ष पद मिळणार हे देखील निश्चित होते. त्यानुसार निवडून आलेले जेष्ठ नगरसेवक विनय गुरव यांच्याच नावाची जोरदार चर्चा होती.

मंगळवारी राजापूर नगर परिषदेच्या बॅ. नाथ पै सभागृहात उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. त्यासाठी आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे होत्या. तर प्रभारी मुख्याधिकारी अभिजित कुंभार,नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक जितेंद्र जाधव यासह सर्व नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते.


राजापूर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून जेष्ठ नगरसेवक विनय गुरव यांच्या वतीने दोन प्रतीत उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.तर त्यांच्या विरोधात महायुतीकडून उमेदवारी अर्ज सादर झाला नाही त्यामुळे विनय गुरव हे उपगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले. या निवडीनंतर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी नूतन उपनगराध्यक्ष विनय गुरव यांचे अभिनंदन केले.

राजापूर नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने जेष्ठ पत्रकार, ओबीसी समन्वय समितीचे अध्यक्ष महेश शिवलकर आणि महायुतीच्या वतीने सुभाष बाकाळकर यांची नियुक्ती करण्यात आली.नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे यांनी दोन्ही स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा केली त्यानंतर नगराध्यक्ष ऍड हुस्नबानू खलिफे, उपनगराध्यक्ष विनय गुरव यांच्यासह सर्व उपस्थित नगरसेवकांनी दोन्ही स्वीकृत सदस्यांचे (नगरसेवक )सभागृहात पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.


त्यावेळी उपस्थित सदस्यांना संबोधित करताना नगराध्यक्षा ऍड हुस्नबानू खलिफे यांनी  सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.आपण सर्व सदस्यांनी एकसंघ पणे काम करून राजापूर शहराच्या विकासासाठी प्रयत्न करूया अशा भावना व्यक्त केल्या. सदर प्रसंगी महायुतीचे गटनेते ऍड राहुल तांबे, महाविकास आघाडीचे गटनेते, माजी नगराध्यक्ष ऍड जमीर खलिफे, जेष्ठ नगरसेवक सौरभ खडपे, सुबोध पवार आदींनी आपले विचार व्यक्त केले.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page