ठाणे : भंडार्ली डम्पिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावरुन स्थानिकांचा रोष शिगेला पोहोचला आहे. ठाणे जिल्ह्यातील तब्बल ९५० हून अधिक मेट्रिक टन कचरा दररोज याठिकाणी आणून टाकला जातो. या कचऱ्यामुळे बाजूच्या परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा दाद मागूनही या प्रश्नावर तोडगा न निघाल्याने आता भंडार्ली तील ग्रामस्थांनी राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारने तातडीने पावले उचलली नाही तर आम्ही ठाण्यातून येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्या रोखून धरू आणि ट्रक जाळून टाकू, असा पवित्रा भंडार्ली येथील गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे हा मुद्दा आता आणखीनच चिघळला आहे. यावर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ठाणे महापालिकेचे कल्याण ग्रामीण हद्दीत येणाऱ्या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. या डम्पिंग ग्राउंड मुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. हे डम्पिंग ग्राउंड तात्पुरते सुरू करण्यात आले होते, दरम्यान हे डम्पिंग ग्राउंड बंद केले जाईल असे स्थानिक नागरिकांना सांगितले गेले होते.मात्र आता काही महिने होऊनही डम्पिंग ग्राउंड ठाणे महापालिकेने बंद केले नाही.त्यामुळे रविवारी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी १४ गावांची सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी कचऱ्याचा गाड्या अडवत आंदोलन केले.
त्यानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या पदा-धिकाऱ्यांसोबत ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती. त्यावेळी आयुक्तांनी आश्वासन दिले होते की ३० सप्टेंबर पर्यंत डम्पिंग ग्राउंड बंद करणार ही डेडलाइन देखील पाळली गेली नाही.यामुळे संतप्त १४ गाव सर्वपक्षीय संघर्ष समिती आणि मनसे आमदार राजू पाटील हे आक्रमक झाले आहे,