
सावंतवाडी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत (वय-६२) यांनी आज, मंगळवारी सकाळी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांचे ते सुपुत्र होते. सावंत यांच्या निधनाने सहकार व शिक्षणक्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.विकास सावंत हे गेले काही महिने आजारी होते.
यातच त्यांना अर्धांगवायूचा धक्का बसला. तरीही त्यांनी आपले काम सुरूच ठेवले होते. काँग्रेससह इतर सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात ते कायम अग्रेसर असायचे. मात्र आज, सकाळी त्याची प्रकृती अचानक खालवली आणि निधन झाले. सावंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात मुलगा, नात, नातू असा मोठा परिवार आहे. युवा नेते विक्रांत सावंत यांचे ते वडील होत.

उद्या होणार अंत्यसंस्कार उद्या बुधवार सकाळी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात सावंत यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर माजगाव येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवले जाणार आहे. दुपारी १२ वा. माजगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजू मसूरकर यांनी दिली.पालकमंत्र्याकडून शोक व्यक्त पालकमंत्री नितेश राणे यांनी विकास सावंत यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांनी शोक व्यक्त केला तसेच जिल्हयातील प्रश्नांची जाण असणारा नेता हरपल्याची भावना व्यक्त केली.
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
