मुंबई- अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील समीकरणे बदलली. उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाले. त्यावेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेता कोण? असा प्रश्न विचारला जात होता. अखेर विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर विधानसभेत काँग्रेसचं संख्याबळ जास्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. विरोधी पक्षनेते पदासाठी राष्ट्रवादीकडून विजय वडेट्टीवार आणि संग्राम थोपटे यांचं नाव चर्चेत होतं. मात्र, अखेर विजय वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधी पक्ष नेतेपदी विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर सभागृहाकडून वडेट्टीवार यांचे अभिनंदन करण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेते पदाच्या खुर्चीवर आसनस्थ केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वडेट्टीवार यांचे अभिनंदन केले. विजय वडेट्टीवारांचे अभिनंदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंन टोला मारला आहे.
२०२४ साली विजय वडेट्टीवार पुन्हा विरोधी पक्ष नेतेपदी येणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विजय वड्डेटीवार यांचे अभिनंदन करतो. आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील विदर्भातील आहेत. विरोधी पक्षनेते देखील विदर्भातील आहेत. देशाच्या राष्ट्रपती देखील विदर्भाच्या सून होत्या. विजय वडेट्टीवार यांच्यावर अन्याय झाला आहे. त्यांना सुरुवातीला करायला हवं होतं पण आता शेवटच्या काळात त्यांना पद मिळालं आहे. विजय वडेट्टीवार यांना शेवटच्या काळात विरोधी पक्षनेते पद मिळते त्यानंतर तुम्ही खूप काम करता आणि सरकार आलं की तुमचा पक्ष तुम्हाला विसरून जातो. इथून पुढे असे होऊ नये हीच अपेक्षा. 2024 साली पुन्हा आम्ही सत्तेत येणार आहोत. त्यावेळी देखील तुम्ही विरोधी पक्षनेते व्हाल.
राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याला सक्षम विरोधी पक्षनेते मिळाले आहेत. शासन चुकलं की त्यांना त्यांची चूक दाखवून देणं हे विरोधी पक्ष नेत्याच काम असतं.या महत्त्वाच्या पदावर दुसऱ्यांदा वडेट्टीवार बसले आहेत. त्या पदाचा मान सन्मान ते वाढवतील. विजय वडे्टीवार यांना माईकची गरज नाही.