जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | एप्रिल १३, २०२३.
महाराष्ट्राचे बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत रत्नागिरी भाजपाचा ‘विजय संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. शनिवार दि. १५ एप्रिल रोजी सकाळी ११:०० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय येथे विजय संकल्प मेळाव्याला ते मार्गदर्शन करणार आहेत. कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर ना. चव्हाण प्रथमच भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयाचा संकल्प घेऊन भाजपा सर्वत्र तयारी करत आहे. रत्नागिरीमध्ये विजयासाठी सिद्धता व्हावी, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण व्हावं यासाठी रवींद्र चव्हाण काय कानमंत्र देतात हे पाहणे रोचक ठरणार आहे.
रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, राजापूर येथून बूथ स्तरावरील कार्यकर्ते, शक्तिकेंद्र प्रमुख, तालुकास्तरीय पदाधिकारी-कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी-कार्यकर्ते यांना या मेळाव्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. यासाठी तालुका आणि शहर अध्यक्ष यांना नियोजनाची जबाबदारी सोपवण्यात आली असून बूथ सशक्तीकरणाचा महत्वपूर्ण संघटनात्मक कार्यक्रम, विजयाचा संकल्प आणि बदललेली राजकीय परिस्थिती अशा अनेक विषयांवर रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच केंद्रशासन राज्यशासनाच्या कल्याणकारी योजनांबाबतही मंत्री महोदय उहापोह करतील. आगामी नगर परिषद, जि. प. निवडणुकांसंदर्भात दिशा निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते.
भाजपाचे दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन हे ही या मेळाव्याला मार्गदर्शन करतील. भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध आघाड्या, मोर्चे यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री. उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.