जित्याची खोड…, बंगळुरूचा पराभव अन् नवीन उल हकने विराटला पुन्हा डिवचले

Spread the love

विराट कोहलीचा संघ आरसीबीच्या पराभवामुळे जितका दु:खी असेल, तितकाच आनंद लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकलाही झाला आहे. बंगळुरूच्या पराभवानंतर नवीनने केलेल्या पोस्टवरून हे कळत आहे.

मुंबई- इंडियन प्रीमियर लीग २०२३ च्या ४३व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि लखनऊ सुपरजायंट्सचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक यांच्यातील वाद काही अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्या सामन्यापासून दोघेही अप्रत्यक्षपणे एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडत नाही आहेत. ‘किंग’ कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने पुन्हा एकदा आरसीबीच्या स्टार फलंदाजाला डिवचले आहे. मुंबईकडून बंगळुरूचा पराभव झाल्यानंतर त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

नवीनने बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याच्या दिवशी एक नाही तर दोन पोस्ट टाकल्या. त्याची पहिली पोस्ट विराट कोहली बाद झाल्यानंतर तर दुसरी पोस्ट बंगळुरूच्या पराभवानंतर आली. आयपीएल २०२३च्या ४३व्या सामन्यात कोहली आणि नवीन उल-हक यांच्यातील भांडण अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्या सामन्यापासून दोघेही अप्रत्यक्षपणे एकमेकांवर शाब्दिक हल्ला करत आहेत.

आता नवीन उल हकने विराटची आणखी कोणती खोडी काढली?

लखनऊ सुपरजायंट्सचा गोलंदाज नवीन-उल-हक इंस्टाग्रामवर आपल्या पोस्टमधून विराट कोहलीला डिवचण्याची एकही संधी सोडत नाही. मुंबई इंडियन्सकडून आरसीबीच्या पराभवानंतर नवीन-उल-हकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि त्याचे नाव न घेता कोहलीची खिल्ली उडवली. नवीन उल हकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये टीव्हीवर सूर्यकुमार यादव आणि नेहल बधेरा यांचा फोटो आहे, त्याशिवाय आंबे देखील ठेवले आहेत. नवीन उल हक याने या फोटोवर लिहिले आहे… “राउंड- २ मध्ये मुंबई इंडियन्सने शानदार कामगिरी केली. हा विजय म्हणजे माझ्याकडे असणाऱ्या आजवरच्या सर्वोत्तम आंब्यांपैकी एक आहे, धन्यवाद धवल परव भाई.” नवीनने या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही, मात्र सोशल मीडिया युजर्सचे म्हणणे आहे की, त्याने विराट कोहलीची खिल्ली उडवली आहे.

आरसीबी आणि मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान नवीन-उल-हकने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती, या पोस्टमध्ये नवीन-उल-हकने कोणाचेही नाव न घेता कोहलीला टोमणा मारला होता. नवीन उल हकने त्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पियुष चावलाचाही फोटो टाकला, त्यासोबत त्याने आंब्याचा फोटो टाकला. या फोटोवर त्यांनी लिहिले आहे.. ‘गोड आंबा.’ नवीनच्या या पोस्टचा संबंध सोशल मीडिया यूजर्स कोहलीशी जोडताना दिसत आहेत.

अफगाणिस्तानच्या या वेगवान गोलंदाजाने यापूर्वीही एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “लोकांशी तुम्ही जसे वागाल तसेच लोकं तुमच्याशी वागतील. जे तुम्ही लोकांना द्याल तेच परत तुम्हाला जसे च्या तसे मिळेल. मग ते चांगले असो किंवा वाईट.”

विराटसोबत वाद झाला होता.

आरसीबी आणि लखनऊ यांच्यातील सामन्यादरम्यान नवीन आणि विराटमध्ये वाद झाला होता. लखनऊची फलंदाजी सुरू होती आणि मोहम्मद सिराज डावातील १७वे षटक टाकत होता. या षटकात सिराज आणि नवीन यांच्यात काही वाद झाला. षटक संपल्यानंतर नवीन पोहोचला असतानाही सिराजने जबरदस्ती चेंडू स्टंपवर मारला. तिथून चर्चा वाढली आणि वाद झाला, मग विराट कोहलीनेही या प्रकरणात उडी घेतली. विराट आणि नवीन यांच्यातील हा वाद सामना संपल्यानंतर हस्तांदोलन होईपर्यंत सुरूच होता. सर्व खेळाडू हस्तांदोलन करत असतानाही जेव्हा विराट आणि नवीन समोरासमोर आले तेव्हा दोघांमध्ये काही संवाद झाला. यानंतर विराटने नवीनचा हात झटकला आणि तेथून प्रकरण वाढले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page