
मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी यांचे शनिवारी (दि. ११) रात्री मुंबईत निधन झाले.कमलाकर नाडकर्णी हे गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आतापर्यंत शेकडो नाटकांवर लिखाण केले आहे. उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक ही पुस्तके लिहिली आहेत. नाट्यसमीक्षेसह कमलाकर हे सुरुवातीच्या वर्षांमध्ये सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. एखाद्या लोकप्रिय कामगार नेत्याच्या भाषणासारखी त्यांची लेखनशैली आहे; असे नाट्यसृष्टीत त्यांच्या लेखनाविषयी म्हटले जायचे. नाट्य संहिता वाचून, तिच्यातले बारकावे काढून, प्रयोगाच्या मर्यादा दाखवत ते नाट्यसमीक्षा लिहायचे.परीक्षणांची शीर्षकं हे नाडकर्णी यांच्या लिखाणाचे आणखी एक वैशिष्टय़ होते. आयएनटीच्या ‘अबक दुबक तिबक’ नाटकाला ‘धबक धबक धबक’ असे शीर्षक देऊन त्यांनी त्या नाटकाची पिसे काढली होती. अमोल पालेकरांच्या ‘राशोमान’ला त्यांनी ‘ठुंग फुस्स’ असे शीर्षक दिले होते (कारण मूळ कलाकृती जपानी होती.) रत्नाकर मतकरींनी लिहिलेल्या ‘माझं काय चुकलं?’ या नाटकाचं हेडिंग होतं, ‘तेच तर सांगतो’, म्हणजे काय ते समजून जायचं. श्री. ना. पेंडशांच्या ‘रथचक्र’ नाटकात मूळ कादंबरीची खोली कशी नाही हे त्यांनी तौलनिक दाखले देत मांडले होते. अ. भा. मराठी नाट्य परिषदेने २०१९ सालचा जीवन गौरव सन्मान देऊन नाडकर्णी यांच्या कारकिर्दीचा सन्मान केला होता.