वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांची माहिती…
चिपळूण /18 डिसेंबर- वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सतर्फे दि. ५ ते ७ जानेवारी २०२४ रोजी चिपळूणमध्ये वाशिष्ठी डेअरी कृषी व पशु प्रदर्शन २०२४ ” कृषी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायाबरोबरच आणखी रोजगाराच्या वाटा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कोकणात दुग्धव्यवसाय यशस्वी होत नाही, अशी नकारात्मक भावना गेल्या अनेक वर्षांपासून रुजलेली आहे. मात्र, याला छेद देत परिपूर्ण आणि अत्याधुनिक दुग्धप्रकल्पाची उभारणी करून सातत्यपूर्ण सर्वोत्कृष्ट दर्जेदार उत्पादनांमुळे अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. हा प्रकल्प यशस्वीपणे दिमाखदार वाटचाल करीत आहे.कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना आर्थिक समृद्धी मिळवून द्यावी, इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, हे स्वप्न उराशी बाळगून स्टेट बँक ऑफ इंडिया, बहादूरशेखनाका येथील बँकेच्या अर्थ साहाय्याने वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. ७ सप्टेंबर २०२१ रोजी चिपळूण तालुक्यातील पिंपळी खुर्द येथे चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लि. चिपळूणचे संस्थापक-अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. नियोजनबद्ध कामामुळे अतिशय कमी कालावधीत अत्याधुनिक वाशिष्ठी दुग्धप्रकल्प उभा राहिला. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने तर राज्याचे उद्योगमंत्री ना. उदयसामंत यांच्या हस्ते प्रत्यक्षपणे या प्रकल्पाचे शानदार उद्घाटन झाले. लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या साक्षीने हा सोहळा झाला.
चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. तर आता रोजगाराची संधी खुली करण्यासाठी शेतीला पूरक व्यवसायाची जोड देऊन शेतकऱ्यांना दूध चळवळीत सक्रिय करण्याचे ठरवले आणि त्यातूनच मे. वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. या प्रकल्पाची संकल्पना प्रत्यक्षात आली.कोकणात या अगोदर काही लोकांनी दुग्धप्रकल्प उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु विविध कारणांमुळे हे प्रकल्प अल्पावधीतच बंद पडले. कोकणात दुग्धप्रकल्प यशस्वी होत नाही, अशीच मानसिकता झालेली. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांची मानसिकता बदलून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसारखे शेतकरी आपल्या कोकणात तयार व्हावेत, असे स्वप्न चव्हाण साहेबांनी पाहिले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाशिष्ठी डेअरीचा प्रकल्प पूर्णत्वास गेला. या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक शेतकऱ्यांसह अनेक लोकांना रोजगाराच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. मात्र, आता एवढ्यावरच न थांबता दुग्ध व्यवसायाबरोबरच येथील शेतकरी आर्थिकदृष्टीने सक्षम झाला पाहिजे. शेतकऱ्यांना रोजगाराच्या वाटा निर्माण होण्याच्या दृष्टीने वाशिष्ठी डेअरी प्रकल्पातर्फे चिपळूणमध्ये कृषी महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सव चिपळूण नागरी पतसंस्थेच्या प्रधान कार्यालयाच्या शेजारील चिपळूण नगर परिषदेच्या सावरकर मैदानात सकाळी १० ते रात्रौ ९ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती या प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी दिली. या कृषी प्रदर्शनात १०० पेक्षा जास्त कंपन्यांचा सहभाग असेल.चर्चासत्रासाठी विशेष कक्ष असणार आहे. तर पशु पक्षी व प्राणी प्रदर्शन, प्री फॅब्रिकेटेड स्ट्रॉल्स, वैविध्यपूर्ण अवजारे, तसेच महिला बचत गटांकरिता ५० स्टॉल मोफत असणार आहेत. या कृषी महोत्सवाला मान्यवरांच्या भेटी व मार्गदर्शन असणार आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
आणखी पुढे माहिती देतांना म्हणाले की, पिलरलेस दोन शामियान, परदेशी भाजीपाला, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम देखील असणार आहेत. एकंदरीत या कृषी महोत्सवाचा कोकणातील शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करतांना शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिष्ठी डेअरी प्रकल्पाचे चेअरमन प्रशांत यादव व मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव यांनी केले आहे.