वसई : वसईतील अनधिकृत बांधकामांवर आता अधोविश्वाची (अंडरवर्ल्ड) नजर पडली आहे. महामार्गावरील एका बांधकाम व्यावसायिकाकडून अंडरवर्ल्डच्या नावाने २ कोटींची खंडणी मागून त्यांच्या कार्यालयावर सशस्त्र हल्ला केल्याची घटना वसईत घडली आहे. दिवसाढवळ्या १० ते १२ हल्लेखोरांनी तलवारने बांधकाम व्यावासियाकाच्या कार्यालयावर हल्ला केला. या हल्ल्यात कार्यालय आणि वाहनांची तोडफोड करण्यात आली. या हल्ल्यात विकासक आणि त्याचे दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत.
जुचंद्र येथील जैन मंदिराजवळ विकासक जितेंद्र यादव यांचे विंध्यशक्ती इस्टेट ॲण्ड इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय आहे. जमीन विकसित करून बांधकाम व्यावसासियाकांना विकण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. त्यांना दोन दिवसांपूर्वी काही गुंडांनी संपर्क करून ‘अंडरवर्ल्ड’ सेठला २ कोटी रुपयांची खंडणी देण्याची मागणी केली. याला यादव यांनी नकार दिला होता. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास यादव आपल्या कार्यालयात बसले असताना १० ते १२ हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांच्या हातात नंग्या तलवारी होत्या. त्यांनी कार्यालयाची तसेच बाहेर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तोडफोड केली. हल्लेखोरांनी यादव आणि त्यांच्या दोन कर्मचार्यांवरही हल्ला केला. या हल्ल्यात ते तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर एका हल्लेखोराटी दुचाकी तिथेच सापडली आहे.