मुंबई- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे दोनवेळा खासदार झाले. पण आता त्यांची हॅटट्रिक होणार नाही. त्यांना खासदार करणारे शिवसैनिकच आता त्यांचा पराभव करतील, अशा शब्दांत ठाकरे गटाच्या कल्याणच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी शिंदेंविरोधात रणशिंग फुंकले आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघात यंदा चुरशीची लढत होणार आहे. सद्यस्थितीत या मतदार संघाचे नेतृत्व डॉक्टर श्रीकांत शिंदे करतात. त्यांना सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पण भाजपने या मतदार संघावर दावा ठोकल्यामुळे त्यांच्या नावाची अद्याप घोषणा झाली नाही. पण शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने येथून वैशाली दरेकर यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे ठाकरे या ठिकाणी कुणाला उमेदवारी देणार? ही उत्सुकता संपली आहे. उमेदवारी जाहीर होताच वैशाली दरेकर यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात रान पेटवले.
माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी जाहीर होणे आनंददायी आहे. मी लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मी उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडेल. मी खासदार म्हणून लोकसभेत जाणार यात कोणतीही शंका नाही, असे वैशाली दरेकर उमेदवारी मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या.
कधीकधी हॅटट्रिक चुकते….
वैशाली दरेकर पुढे बोलताना म्हणाल्या की, आपल्या पुढे कोणता उमेदवार आहे हे पाहणे महत्त्वाचे नाही. कधीकधी हॅटट्रिक चुकते. समोरचा बॉलर जुना जाणता असेल तर ती निश्चितच चुकते. श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत पार केलेल्या शिड्यांना उद्धव ठाकरे यांनी मदत केली. ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे यांना दोन वेळा खासदार केले आता तेच शिवसैनिक त्यांना पाडणार आहेत.
कोण आहेत वैशाली दरेकर?…
वैशाली दरेकर या उद्धव ठाकरे यांच्या कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर त्यांच्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत गेल्या. त्यांनी मनसेच्या उमेदवारीवर 2009 ची लोकसभा निवडणूकही लढली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्या पुन्हा शिवसेनेत परतल्या. एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर वैशाली दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणे पसंत केले. त्याची बक्षिसी आता त्यांना उमेदवारीच्या रुपात मिळाली आहे.
वैशाली दरेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक संघटनात्मक पदे भूषवली. त्यांनी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटातून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.