
सिंधुदुर्ग,: कोकण हा एकेकाळचा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण याच बालेकिल्ल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. कोकणातले फक्त तीन आमदार आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत, यात वैभव नाईक, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांचा समावेश आहे, पण आता वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार का? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
आमदार वैभव नाईक यांना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदावरून दूर करण्यात आल्यामुळे या चर्चांना तोंड फुटलं. वैभव नाईकांनी मात्र या चर्चांचं खंडन केलं आहे. जिल्ह्याबाहेर आपण करू लागल्यामुळे आपली जिल्हाध्यक्ष पदावरून मुक्तता करण्यात आल्याचं स्पष्टीकरण वैभव नाईक यांनी दिलं.
वैभव नाईकांनी हे स्पष्टीकरण दिल्यानंतरही आता कोकणात नवी घडामोड घडली आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवरून वैभव नाईक यांचे फोटो गायब झाले आहेत. वैभव नाईकांचे फोटो गायब होण्यावरून भाजप नेत्याने विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

आपल्या मुलीला कुडाळ मालवण मतदार संघातून विधानसभेची तिकीट मिळवून देण्यासाठी विनायक राऊत यांनी आमदार वैभव नाईक यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून पत्ताच कट केला आहे.यामुळे आमदार वैभव नाईक हे शिंदे गटात जाणार हे निश्चित झाले आहे’, असा घणाघाती आरोप करत भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांनी केला आहे.
