दिवा-कल्याण-डोंबिवलीत अवकाळी पावसाची हजेरी; चाकरमान्यांची तारांबळ….

Spread the love

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग) मंगळवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून ठिबकणाऱ्या अवकाळी पावसाने साडे सहा वाजता दिवा-कल्याण-डोंबिवलीत विजांच्या कडकडाटासह दमदार हजेरी लावली. सकाळीच कामावर निघणाऱ्या नोकरदार, वृत्तपत्र विक्रेते ते शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडवली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात पहाटेपासून उघड्यावर भाजीपाला ठेऊन विक्री व्यवहार करणारे विक्रेते, खरेदीदार, वाहन चालकांची अवकाळी पावसाने भंबेरी उडवली. उघड्यावर ठेवलेला भाजीपाला, फळे, फुलं झाकून ठेवण्यासाठी विक्रेत्यांना धावपळ करावी लागली. बाजारपेठांमध्ये सकाळचे व्यवहार होत असलेल्या ठिकाणी चहा, नाष्टा मंचकावर ठेऊन नियमित व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना इमारती, निवाऱ्याचा आडोसा घ्यावा लागला. वृत्तपत्र विक्रेत्यांना काही वेळ इमारतींचा आडोसा घेऊन वर्तमानपत्र भिजू नये म्हणून काळजी घ्यावी लागली.

मंगळवारी पहाटे साडे पाच वाजल्यापासून विजांचा लपंडाव सुरू होता. त्यानंतर काही वेळाने सोसाट्याचा वारा सुरू झाला. पावसाची रिमझिम सुरू झाली. एक तासानंतर साडे सहा वाजता जोरदार वाऱ्यांसह पावसाने दमदार हजेरी लावली. नोकरवर्गाची रेल्वे स्थानक, बस स्थानकात जाण्याची गडबड, मुलांची शाळेत जाण्याची धावपळ अशा वेळेत पावसाने हजेरी लावल्याने घरातील छत्री, रेनकोट बाहेर काढण्याची वेळ रहिवाशांवर आली

सकाळी सात वाजता पावसाचा जोर ओसरला. नियमितचे व्यवहार विनाछत्री सुरू झाले. सोमवारी मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान पावसाने काही वेळ हजेरी लावली होती. अवकाळी पावसाने रब्बी पिके घेणारा शेतकरी हैराण आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी जणशक्तीचा दबावर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा मराठी न्यूज वेबसाइट जनशक्तीचा दबावर.
भारत सरकार मान्यताप्राप्त वृत्तपत्र
दबाव जनशक्तीचा ……निर्धार लोकशाहीच्या सन्मानाचा

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page