पुणे : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटामुळे हिरावला गेला. आता पुन्हा सोमवारनंतर राज्यात अवकाळी पाऊसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
सोमवारनंतर राज्याच्या उत्तर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, त्यानंतरचे दोन दिवस ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता असून १६ व १७ मार्चला संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे
रविवार नंतर ढगाळ स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे सोमवारी आणि मंगळवारी उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत अंशत: ढगाळ वातावरण राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेचीही शक्यता आहे. मात्र, पाऊस हलक्या स्वरूपाचा असेल.