रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांची केली सांत्वनपर मदत
राज्यात सामाजिक सलोख्यासाठी समाजाने सुध्दा पुढे आले पाहिजे – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मुंबई दि.16- लातुर जिल्हयातील रेणापुर मधील मातंग समाजाचे मजुर गिरधारी तपघाले यांची 3 हजार रुपयांच्या कर्जासाठी जातीवादी सावकाराने अत्यंत निर्घुण हत्या केली. या अमानुष प्रकाराचा रिपब्लिकन पक्षातर्फे तिव्र निषेध करुन दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटूंबियांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी रेणापुरमधील तपघाले यांच्या घरी जावुन सांत्वनपर भेट घेतली. यावेळी रिपब्लिकन पक्षातर्फे 2 लाख रुपयांचा सांत्वनपर निधी तपघाले कुटूंबियांना मदत म्हणुन देण्यात आला. रिपब्लिकन पक्ष तपघाले कुटुंबियांच्या पाठीशी असल्याचे सांगत शोकाकुल तपघाले कुटुंबियांना ना. रामदास आठवले यांनी धीर दिला.
दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या हत्येचा एकुण घटनाक्रम त्यांच्या कुटुंबियांनी सांगतांना स्थानिक पोलीसांनी कोणतीही मदत केली नसल्याची तिव्र खंत व्यक्त केली. झालेला प्रकार अत्यंत मन विदीर्ण करणारा आहे. तसेच स्थानिक पोलीसांनी आपल्या कर्तव्यात कसुर केल्याचे निष्पन्न झाले असल्याने जबाबदार पोलीस अधिका-यांना निलंबीत करुन त्यांची चौकशी करुन नोकरीतुन बडतर्फ करावे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली. यावेळी त्यांनी लातुर जिल्हा पोलीस अधिक्षक सोमेय मुंडे यांच्याशी चर्चा केली.
कोणत्याही जाती-धर्माच्या अन्यायग्रस्ताला न्याय देण्याची त्याची तक्रार नोंदवुन घेण्याची पोलीसांची जबाबदारी आहे. माणुसकी आणि सामाजिक जाण नसलेल्या पोलीसांना नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. रेणापुर मधील मातंग समाजाच्या मजुराच्या हत्येप्रकरणी पोलीसांचा हलगर्जीपणा सुध्दा तेवढाच जबाबदार आहे. राज्यातील अवैध सावकारी करणा-यांचा शोध घेवून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली.
राज्यात नांदेडमधील दलित तरुण अक्षय भालेराव यांची झालेली निर्घुण हत्या यानंतर लातुर रेणापुरमधील गिरधारी तपघाले यांची झालेली हत्या या पार्श्वभुमीवर राज्यात सामाजिक धार्मीक ताणतणाव दुर केले पाहिजेत. राज्यात सामाजिक आणि धार्मिक सलोखा निर्माण झाला पाहिजे. सामाजिक सलोखा निर्माण करण्याची जबाबदारी केवळ शासनाची नसुन समाजाची सुध्दा आहे. दलितांवर अन्याय करणा-या सवर्णामधील एखाद्या गुन्हेगारास गावातील अन्य सवर्ण बांधवांनी पाठीशी घालु नये. सर्वच सवर्ण दलितांवर अन्याय करीत नाहीत. जातीभेद हा कायद्याने नष्ट झाला आहे. मात्र काही मुठभर लोक आजही जातीभेदाच्या अहंकारातुन दलितांवर अन्याय, अत्याचार करतात. त्यांचे कुटुंब उध्दवस्त करतात असा गुन्हा केल्यावर स्वतः गुन्हेगार होवुन स्वतःचेही कुटुंब उध्वस्त करुन घेतात. दलितांवर अत्याचार करणा-याला समाजाने रोखले पाहिजे. सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी दलितांसोबत गावातील सवर्ण समाजाने पुढे आले पाहिजे. असे आवाहन ना. रामदास आवठले यांनी केले.
गिरधारी तपघाले यांची हत्या करणा-या आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी हा खुन खटला जलदगती न्यायालयात चालवावा व विशेष सरकारी वकील म्हणुन अॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबियांना अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार 8 लाख 25 हजार रुपये सांत्वनवर निधी सामाजिक न्याय विभागातर्फे मिळणार असुन त्यातील 4 लाख रुपये त्यांना देण्यात आले आहेत. दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात यावी आणि तपघाले कुटुंबियांचे सुरक्षित स्थळी लातुर शहरात पुनर्वसन करावे. अशी मागणी पुढे आली असुन त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. मुख्यमत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवुन दिवंगत गिरधारी तपघाले यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत, त्यांचे पुनर्वसन आणि त्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.
यावेळी कमल गिरधारी तपघाले, कल्लुभाई केशव तपघाले, अरुण तपघाले, सचिन तपघाले, ऋतिक तपघाले, योगेश तपघाले, विपुल तपघाले, तसेच औसार – रेणापुरचे उपविभागीय अधिकारी अविनाश कोर्डे, उपविभागीय पोलीस अधिकारी कल्याणकर, रेणापुरच्या तहसिलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड, रिपाइंचे चंद्रकांत चिकटे, लातुर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे, देविदास कांबळे, रिपाइंचे धाराशिवचे जिल्हाध्यक्ष राजा ओवाळ, संजय बनसोडे, डॉ. सुधाकर गुळवे, जितेंद्र बनसोडे, भास्कर रोडे, आतिष चिकटे, आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.