रत्नागिरी : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे गुरुवार दिनांक 30 मार्च 2023 रोजी रत्नागिरीच्या दौऱ्यावर येत आहेत. ना. गडकरी हे नाणीज येथील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येत असले तरी मागील सहा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गाची ते पाहणी करणार असल्याचे बोलले जात आहे. ना. नितीन गडकरी यांच्या दौरा रखडलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणणाचे काम सुरू असले तरी संगमेश्वर, रत्नागिरी तसेच लांजा या तालुक्यातील काम रखडले आहे. संगमेश्वरमधील आरवली ते तळेकाटे तसेच तळेकाटे येथे लांजा तालुक्यातील वाकेड या दोन टप्प्यांमधील जवळपास 90 किलोमीटरचे काम रखडले आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे यासाठी कोकणातील ज्वलंत प्रश्नांसाठी झगडणाऱ्या जन आक्रोश समितीने मागील पंधरावड्यात आझाद मैदानावर जन आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता
गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या नाणीज येथील कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी दौऱ्यावर येत असल्याने ते रखडलेल्या महामार्गाच्या कामाची पाहणी देखील करतील असे बोलले जात आहे. गुरुवारच्या आपल्या दौऱ्यात ना गडकरी महामार्ग संदर्भात नेमके काय बोलतात याकडे कोकणवासीयांचे लक्ष वेधून राहिले आहे.
या दौऱ्यात त्यांच्यासमवेत राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत हे देखील सहभागी होणार आहेत