केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचा मुंबई दौरा; निमित्त गणरायाच्या दर्शनाचं, कारण निवडणुकीच्या राजकारणाचं…

Spread the love

भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (9 सप्टेंबर) ‘लालबागच्या राजा’चं दर्शन घेतलं. दरवर्षीप्रमाणे हा शाहांचा गणेश दर्शन दौरा असला, तरी यंदाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यास विशेष महत्त्व आहे.

मुंबई : गणपती दर्शनाच्या निमित्तानं केंद्रीय गृह मंत्री अमित शाह दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अमित शाह यांचा हा दौरा झाल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलाय. या दौऱ्यात अमित शाह यांनी सपत्नीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, लालबागचा राजा, त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील बाप्पाचं दर्शन घेतलं. हे सर्व करत असताना महायुतीतील अनेक नेते त्यांच्यासोबत होते. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती चर्चेचं कारण ठरली. गणपती बाप्पाच्या दर्शनासोबत अमित शाहांनी या दौऱ्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महायुतीतील नेत्यांची झाडाझडती घेत कानमंत्र सुद्धा दिला असल्याची चर्चा आहे.

भाजपा पुन्हा नंबर एकचा पक्ष बनवण्याची तयारी…

राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दरवर्षी मुंबईत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. महायुतीचं सरकार आल्यानंतर हा त्यांचा मुंबईचा सलग तिसरा दौरा आहे. मात्र, या दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली. तर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागल्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कुठल्याही परिस्थितीत मजबूत सरकार बनवण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. परंतु यंदाचा आकडा हा 2019 च्या 105 च्या भाजपाच्या आकड्यापेक्षा मोठा असायला हवा त्या दृष्टीनं भाजपानं पावलं उचलायला सुरुवात केलीय. राज्यातील निवडणुकीची पूर्ण जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर दिल्यानंतर अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यात रविवारी रात्री सह्याद्री अतिथी गृहावर भाजपा कोअर कमिटीची बैठक घेतली. या बैठकीत भाजपा नेत्यांना विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सूचना देण्यात आल्या सांगितल जातंय.


फडवणीस विषय योग्य प्रकारे हाताळतील…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या या मुंबई दौऱ्यात भाजपा नेत्यांना कानमंत्र देण्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुतीत कुठल्याही पद्धतीचे मतभेद होणार नाहीत याची काळजी घेण्याची विनंती केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा जागावाटपाच्या मुद्द्यावर महायुतीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. परंतु, सामंजस्यपणे यावर तोडगा काढून देवेंद्र फडणवीस हा विषय योग्य पद्धतीने हाताळतील अशी खात्री अमित शाह यांना आहे.


अजित पवारांचे भावनिक मुद्द्याकडे लक्ष….

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्याविषयी बोलताना ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंत माईणकर म्हणाले की, “केंद्रीय गृहमंत्र्यांचा हा दौरा गणपतीच्या दर्शनाच्या निमित्तानं असला तरी सुद्धा यामागं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं गणित लपलेलं आहे, हे कुणीही सांगू शकतं. अमित शाह यांनी त्यांच्या या दौऱ्यादरम्यान विविध बैठकांचं सत्र घेतलं. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेला दारून पराभव आणि त्यानंतर कायदा व सुव्यवस्था या प्रश्नावर निर्माण झालेली राज्यातील परिस्थिती, ही भाजपा त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शाह आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. या कारणासाठी आता त्यांना विधानसभा निवडणुकीत जनतेत जाताना जपून पावलं उचलावी लागणार आहेत.”

अजित पवारांची भूमिका अस्पष्ट?

दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अमित शाह यांच्या दौऱ्यातील अनुपस्थिती प्रकर्षाने चर्चेचं कारण ठरली. सध्याची अजित पवार यांची वागणूक ही भाजपा त्यासोबतच शिंदे गटाच्या नेत्यांनाही पटणारी नाहीय. एकीकडं लोकसभा निवडणूक लढवल्याकारणानं घरात फूट पडली गेल्याचं कबूल करायचं आणि दुसरीकडं बारामती सोडण्याची तयारी दाखवायची. या भावनिक मुद्द्याच्या गोष्टी अजित पवार सध्या करत आहेत. या कारणानं अजित पवार यांच्याविषयी देखील येत्या दिवसात काय निर्णय घ्यावा, याबाबत सुद्धा अमित शाह यांनी चाचपणी केल्याची माहिती समोर आलीय.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page