भाजप महापालिका निवडणूका स्बळावर लढण्याच्या तयारीत? केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्याकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा…

Spread the love

मुंबई- विधानसभा निवडणुकीत नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या महायुतीमधील पक्ष येत्या काही महिन्यांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वबळ आजमवण्याची तयारी भारतीय जनता पक्षानं सुरु केली आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाहा तीन दिवस राज्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. मुंबई, ठाणे, पुण्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती मिळत आहे.

अमित शाह मुंबईत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंगळवारी सकाळी त्यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. या भेटीत शिंदेंनी शहांसोबत मुंबई महापालिका निवडणूक सोबत लढवण्यासंदर्भात चर्चा केली. शिंदेंनी शहांकडे मुंबईतील १०७ जागा मागितल्याचं वृत्त लोकमतनं दिलं आहे. मुंबई महापालिकेत एकूण २२७ प्रभाग आहेत. यातील जवळपास १०७ जागांवर आपल्याकडे प्रभावी उमेदवार असल्याचं शिंदेंनी शहांना सांगितलं. शहांनी शिंदे यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण त्यांना कोणताही शब्द दिलेला नाही. शहांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला. मुंबई, ठाणे, पुणे या महत्त्वाच्या शहरांमध्ये स्वबळावर लढण्याची परिस्थिती, तिथे असलेली पक्षाची ताकद आणि त्यातून यश मिळण्याची शक्यता किती याबद्दलची चाचपणी करण्याच्या सूचना शहांनी दिल्या आहेत. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

मुंबई महापालिकेची शेवटची निवडणूक २०१७ मध्ये झाली. त्यावेळी शिवसेना एकसंध होती. पक्षानं ८४ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपनं ८२ जागांवर विजय मिळवला होता. शिवसेनेत फूट पडल्यामुळे त्यांची ताकद विभागली गेली आहे. तर भाजपची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे स्वबळावर लढून मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसवण्याचा भाजपचा मनसुबा आहे. उद्धव ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत शह दिल्यानंतर आता भाजपनं आपल्याच मित्रपक्षांना धक्का देण्याची रणनिती आखली आहे. त्यासाठी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या बालेकिल्ल्यांची निवड केली आहे. शिंदेंच्या ठाण्यात आणि अजित पवारांच्या पुण्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी भाजपनं सुरु केली आहे. २०१७ मध्ये ठाणे महापालिकेत भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. आता भाजपनं ठाण्यात प्रचंड ताकद लावली आहे. मंत्री गणेश नाईक यांच्याकडे ठाण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. दरम्यान, भाजपच्या शतप्रतिशत रणनितीचा फटका मित्रपक्षांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page