
८ मे/बंगळुरू: कर्नाटकातील विधानसभा निवडणूका जिंकण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कर्नाटकातील दोड्डाबल्लापुरा आणि बेळगावी येथे मेगा रोड शो केला.
यादरम्यान त्यांनी कर्नाटकात पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याबाबत सांगितलं. त्याचवेळी बजरंग दलावर बंदी घालण्याबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर म्हटलं की, काँग्रेस नेहमीच तुष्टीकरणाचं राजकारण करतं. कर्नाटकातील निवडणुकीच्या परिस्थितीवर भाजपचे स्टार प्रचारक अमित शहा यांनी दावा केला की, इथे पूर्ण बहुमताने डबल इंजिनचे सरकार स्थापन होणार आहे.

ते म्हणाले की, कर्नाटकात पीएम मोदी आणि भाजपच्या कार्यक्रमांचे स्वागत होत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 110 जागा जिंकल्या होत्या, यावेळी तो आकडाही ओलांडणार आहे. शाह म्हणाले, की हे भाजपने जोडलेलं नाही, हे तर कर्नाटकच्या जनतेने जोडलं आहे. काँग्रेस आजपासून नव्हे तर वर्षानुवर्षे तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. आपल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी काँग्रेस असं म्हणत आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.

शाह म्हणाले, बोम्मई आमचे मुख्यमंत्री आहेत. आता काय घोषणा करायची. पुढे कोण मुख्यमंत्री होणार हा नंतरचा विषय आहे. ते आजही मुख्यमंत्री आहेत. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर येणाऱ्या प्रतिक्रियेवर अमित शाह म्हणाले की, ही एक सामाजिक समस्या आहे आणि त्याकडे डोळेझाक करून बघू नये, हे मला मान्य आहे. त्याचा सामना केला पाहिजे आणि त्यावर उपायही शोधला पाहिजे.
