उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मानले आभार
पनवेल – पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडीत वीज पुरवठा करण्याकरिता विविध योजने अंतर्गत यापूर्वी अंदाजे २५४ कोटी ११ लाख खर्च करण्यात आले असून, उर्वरित ४८०.४० कोटी रुपयांची कामे सुधारीत वितरण क्षेत्र योजनेच्या (आरडीएसएस) अंतर्गत प्रस्तावित केलेली आहेत,असे लेखी उत्तर राज्याचे ऊर्जा व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नाला दिले.
पनवेल शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे तसेच संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणामुळे वीज खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ होत असून दररोज विजेचा दाब सातत्याने कमी जास्त होत असल्यामुळे महागड्या विद्युत उपकरणांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन नागरिकांना नाहक भूईंड सहन करावा लागत असून वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, असा तारांकित प्रश्न आमदार प्रशांत ठाकूर यांनी या अधिवेशनात दाखल केला होता तर मागील अधिवेशनात पनवेलमधील ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्यामुळे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याची कामे सुरू झाली नसल्याची बाब लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित करून ओव्हरहेड विद्युत वाहिन्या भूमिगत करणे,नवीन सबस्टेशन,नवीन ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता तसेच मोडकळीस आलेले खांब, विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी तात्काळ आवश्यक तो निधी उपलब्ध करण्याबाबत शासनाने तातडीने कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळात केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काम पूर्ण करण्यासाठी निधी देणार असल्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात दाखल केलेल्या तारांकित प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले कि, पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात माहे ऑक्टोबर-२०२३ मध्ये वीजपुरवठा खंडीत होण्याच्या ११ घटना घडल्या आहेत. अखंडित वीज पुरवठा करण्याकरिता महावितरण मार्फत गरजेनुसार वीज वितरण व्यवस्था सक्षमीकरण करण्याकरीता पायाभूत आराखडा तसेच इतर केंद्र शासनाच्या योजनांतून रोहित्रे क्षमता वाढ, नविन रोहित्रे, जिर्ण झालेले खांब बदलणे, कमी दाबाचा वीज पुरवठा होणाऱ्या ठिकाणाचे विज खांब व तारा बदलणे व इतर कामे हाती घेतली जातात. पनवेल तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागास अखंडीत वीज पुरवठा करण्याकरीता विविध योजनेअंतर्गत यापूर्वी अंदाजे २५४.११ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, उर्वरित ४८०.४० कोटी रुपयांची कामे सुधारीत वितरण क्षेत्र योजनेच्या (RDSS) अंतर्गत प्रस्तावित केली असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेली मागणी आणि पाठपुराव्याला मोठे यश आले असून वीज ग्राहकांना याचा मोठा फायदा होणार आहे.
पनवेल तालुक्यातील खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजे, पनवेल शहर व ग्रामीण या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे आणि त्याचबरोबरीने लघु उच्च दाब वीज प्रवाहामुळे महागडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वारंवार खराब होण्याचे प्रकार निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने गेल्या मागील अधिवेशनात मी विद्युत संदर्भात ट्रान्सफॉर्म, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या बदलणे, वरील वाहिन्या भूमिगत करणे अशी वीज संबंधित कामे लवकरात लवकर करण्याची आवश्यकता सभागृहात मांडून या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती. आज प्रश्नाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४८० कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आल्याची लेखी स्वरूपात माहिती दिली आहे. त्या अनुषंगाने लवकरच या कामांना सुरुवात होणार असून पनवेलकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे मनपूर्वक आभार मानतो.
- आमदार प्रशांत ठाकूर