
नंदुरबार- नंदुरबारमधील शहादा तालुक्यातील कोंढावळ येथील लखन नरेंद्र माळी या कबड्डी खेळाडूचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कबड्डीपट्टू लखन हा धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील अहिंसा पॉलिटेक्निक कॉलेजला इलेक्ट्रॉनिक डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
लखनची घरची परिस्थिती हलाखीची आहे. वडील नरेंद्र काशीराम माळी यांच्याकडे जेमतेम अडीच एकर शेती. दोन भाऊ, एक बहीण, आई-वडील सर्वच जण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे. शेतातून मजुरी करून येत असतानाच पोहण्याचा मोह लखनला आवरता आला नाही आणि नियतीने तिथेच डाव साधला. लखन पाण्यात गेला तो बाहेर आलाच नाही. लखनच्या मागे वडील काशीराम माळी, आई योगिताबाई माळी, थोरला भाऊ गोपाल माळी, विवाहित बहीण असा परिवार आहे. लखनच्या जाण्याने परिसरासह कोंढावळ गावावर शोककळा पसरली आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या ट्रायलला देखील निवडण्यात आले होते. पण परिस्थितीची जाणीव असलेल्या लखनने कॉलेजच्या परीक्षेला अधिक महत्त्व दिले. इंटरकॉलेजला राज्यस्तरावर खेळत असताना त्याने खेलो इंडिया स्पर्धेच्या ट्रायल दिल्या होत्या, तसेच त्याचे खेलो इंडिया आणि प्रो-कबड्डी खेळण्याचे स्वप्न होते. गावातील इतर तरुणांसारखे आपणही देशसेवेसाठी आर्मीत भरती व्हावे यासाठी प्रयत्न सुरू होते. अतिशय गरिबीच्या परिस्थितीतून आपल्या स्वतःची पायवाट निर्माण करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रयत्न करत होता.