परशुराम घाटासाठी नव्याने उपाययोजनांचा प्रस्ताव; शिवेंद्रसिंहराजेंचा अंधारात पाहणी दौरा,शिवसेनेच्या उमेश सकपाळ यांनी मंत्र्यांसमोर अधिकारी शेलारांना झापले…

Spread the love

*चिपळूण, प्रतिनिधी:* मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात परशुराम घाटात सातत्याने दरड कोसळण्याच्या घटना घडत असून, यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाच्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजेंनी चिपळूण तालुक्यातील विविध ठिकाणांना भेट दिली. सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास त्यांचे परशुराम घाटाजवळ आगमन झाले. महायुतीच्या वतीने आमदार शेखर निकम यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयद्रथ खताते, भाजपचे नेते रामदास राणे, शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ, माजी नगरसेवक विजय चितळे, राष्ट्रवादीचे शहरप्रमुख मिलिंद कापडी, मयूर खेतले, निहार कोवळे, सुयोग चव्हाण, माजी सभापती शौकत मुकादम, उदय उतारी, भाजपचे विनोद भूरण यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी चिपळूण शहरातील पुलाचे काम सुरू असताना झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर, एका विद्यार्थ्यावर सळी कोसळल्याने झालेल्या घटनेप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निहार कोवळे यांनी निवेदनाद्वारे मंत्र्यांकडे केली. महामार्गावरील अडचणींबाबत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी विविध मुद्द्यांवर निवेदने सादर केली.

यानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी परशुराम घाटाची प्रत्यक्ष पाहणी न करता ‘घाटाला वळसा’ घालून थेट चिपळूण शहरात आगमन केले. येथे शिवसेनेचे शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देत सत्कार केला. या वेळी उपशहर प्रमुख सुयोग चव्हाण, राणी महाडिक, धीरज नलावडे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

पुढे मंत्री पाग पॉवर हाऊस येथे पोहोचले. येथे झालेल्या चर्चेत माजी आमदार विनय नातू, माजी नगरसेवक शशिकांत मोदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, उमेश सकपाळ यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. या वेळी उमेश सकपाळ यांनी वारंवार होणाऱ्या अपघातांची माहिती देताना संदेश भालेकर यांचा अलीकडील अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले. विजेची अनुपलब्धता, पावसात पाणी साचणे, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे शशिकांत मोदी यांनी निदर्शनास आणले.

या ठिकाणी महामार्ग विभागाचे अधिकारी शेलार यांनी स्थानिकांना कल्पना न देता दौरा केल्याबद्दल शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ यांनी संताप व्यक्त केला. “असे कामचुकारू अधिकारी जनतेच्या जिवाशी खेळत असून, त्यांनी आपली कामाची पद्धत बदलावी,” असा इशाराही त्यांनी दिला. “माझ्या गावातील लोकांचा जीव वाचवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पण असे अधिकारी असतील, तर ते खपवून घेतले जाणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. महामार्गाचे काम वर्षभरात पूर्ण होईल आणि शंभर टक्के प्रगती होईल, अशी नवी डेडलाईनही त्यांनी जाहीर केली.

मात्र, परशुराम घाटाची पाहणी न केल्यामुळे स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अंधारात दौरा पार पाडल्यामुळे घाटातील प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन न झाल्याची टीका करण्यात येत आहे.

🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page