रेशीम उद्योजकांच्या मागण्यांसाठी उल्का विश्वासराव यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट…

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | फेब्रुवारी १८, २०२३.

भाजपा उद्योग आघाडी महिला समिती सहप्रमुख उल्का विश्वासराव कोकणातील उद्योगांना चालना देण्यासंदर्भात नेहमीच सकारात्मक भूमिका मांडत असतात. ‘प्रत्येक हाताला योग्य काम मिळाले पाहिजे’ यासाठी शासन, प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते आणि काम करू इच्छिणारी व्यक्ती अशा चारही स्तंभांनी एकत्र आल्यास उद्योगाची इमारत डौलाने उभी राहील असे त्यांचे म्हणणे आहे. विविध नवउद्योजकांना भेटून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी त्या सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

लांजा-राजापूर तालुक्यांतील काही कष्टकरी शेतकर्‍यांनी एकत्र येऊन रेशीम उत्पादन करण्याचे ठरवले. याकरिता त्यांनी एक ‘रेशीम समूह गट’ तयार करून उद्योग सुरू केला. यामध्ये त्यांना अनेक समस्यांचा सामना करत वाटचाल करणे क्रमप्राप्तच होते. मात्र या सर्व शेतकर्‍यांनी अत्यंत नेटाने आणि संयमाने आपला उद्योग पुढे सुरू ठेवलेला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील वातावरण रेशीम उद्योगासाठी अत्यंत पूरक आहे. जमीन आणि हवामान पूरक असल्याने या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होऊ शकतो. यासाठी स्थानिक पातळीवर तंत्रशुद्ध मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. मात्र लागणारी यंत्रणा आणि रेशीम कार्यालय उपलब्ध नसल्याने शेतकरी रेशीम उद्योगाकडे गांभीर्याने पहात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. याशिवाय या व्यवसायाच्या दृष्टीने गरजेच्या असणार्‍या सोयीसुविधा रत्नागिरी जिल्ह्यात उपलब्ध नाहीत. शेतकर्‍यांना रेशीम उद्योगासाठी कोणत्याही स्वरूपाचे आर्थिक अनुदान मिळत नाही या कारणाने त्यांना चालना मिळत नाही. सदर विषयांना केंद्रस्थानी ठेऊन उल्का विश्वासराव यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा. एम. देवेंदर सिंह यांच्याकडे निवेदन सादर केले. सोबतच या क्षेत्रात उपलब्ध असणार्‍या भविष्यातील संधींची जाणीव करून देत महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना रेशीम व्यवसायातील अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत अशी मागणी केली.

मा. जिल्हाधिकाऱ्यांनी हे निवेदन स्विकारत या रेशीम समूहातील लोकांना प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश दिले. शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या रेशीम उद्योगाची आपल्या स्तरावरून पहाणी करून तशा स्वरूपाचा अहवाल सादर करण्यास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले. लवकरच असे अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळतील याकरिता आपण सर्वजण सकारात्मक प्रयत्न करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विविध क्षेत्रांत उद्योजकता वाढीसाठी स्वतः प्रयत्न करून आम्हाला सजग केल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व्यक्त करतो असे श्री. सिंह, उल्काताई विश्वासराव यांना म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page