माँस्को- रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले ‘महायुद्ध’ थांबण्याचे नाव घेत नाही आहे. दरम्यान, रशियाने युक्रेनवर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. रशियाचे म्हणणे आहे की, युक्रेनने पुतिन यांना मारण्यासाठी क्रेमलिनवर ड्रोनने हल्ला केला. मात्र या हल्ल्यात पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत.
रशियाने बुधवारी एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पुतिन यांची हत्या करण्यासाठी काल रात्री क्रेमलिनवर दोन ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा हे ड्रोन रशियाने हाणून पाडले. दरम्यान, रशियाने या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हटले आहे. तसेच, क्रेमलिनचे म्हणणे आहे की, 9 मे रोजी होणाऱ्या विजय दिनाच्या परेडपूर्वी हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पुतिन यांच्यावर ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मात्र यामध्ये पुतिन यांना कोणतीही इजा झालेली नाही. आम्हाला बदला घेण्याचा अधिकार आहे. ड्रोन हल्ल्यानंतरही 9 मे रोजी होणारी विजय दिन परेड वेळेवर होणार आहे.
क्रेमलिन मीडियानुसार, या हल्ल्यानंतर पुतिन नोवो-ओगारेवो येथील त्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या बंकरमधून काम करतील. रशिया युक्रेनच्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. या ड्रोन हल्ल्यानंतरही रशियात 9 मे रोजी होणारी परेड पुढे ढकलली जाणार नाही. त्याच वेळी, मॉस्कोच्या महापौरांनी ड्रोनच्या उड्डाणावर बंदी घातली आहे. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांनी क्रेमलिनवर झालेल्या ड्रोन हल्ल्यासंदर्भात एक स्टेटमेंट जारी केले आहे. युक्रेनचा याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. युक्रेन लवकरच रशियावर मोठा हल्ला करेल, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.