२६ आणि २७ जुलै या दोन दिवशी उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रश्नांना देणार उत्तरं
मुंबई – उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टिझर रिलिज
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक घणाघाती मुलाखत २६ आणि २७ जुलै या दोन दिवशी होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेच ही मुलाखत घेणार आहेत. त्याचा टिझर रिलिज झाला आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख खेकडा असा केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून जे म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला त्यावरही भाष्य केलं आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या ट्वीटर पेजवर या मुलाखतीचा पहिला टिझर आला आहे. जो चांगलाच चर्चेत आहे.
तुमच्या नेतृत्वाखालील सरकार मागच्या वर्षी मुसळधार पावसात वाहून गेलं.. असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे “सरकार वाहून गेलं नाही तर खेकड्याने धरण फोडलं.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. तसंच इतरही अनेक मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं आहे. हा प्रोमो चांगलाच चर्चेत आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे, त्यांनी केलेलं बंड, देवेंद्र फडणवीस भाजपा, राष्ट्रवादीतलं बंड या सगळ्यावर भाष्य करणार हे उघड आहे. २१ जून २०२२ या दिवशी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेतृत्वाला म्हणजेच उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं. एकनाथ शिंदेंसह सुरुवातीला १६ आमदार नॉट रिचेबल झाले त्यानंतर ही संख्या ४० झाली. यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. २९ जून २०२२ ला उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने मविआ सरकार कोसळलं. त्यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागच्या एक वर्षात घडलेल्या या सगळ्या घडामोडींवर उद्धव ठाकरे हे भाष्य करणार हेच हा टिझर सांगतो आहे.
वर्षातील सर्वात मोठी आणि प्रखर मुलाखत! “आवाज महाराष्ट्राच्या कुटुंबप्रमुखांचा!” असं शीर्षक या टिझरला देण्यात आलं आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या प्रश्नांना उद्धव ठाकरे प्रश्न विचारताना दिसत आहेत.