मुंबई- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गुरुवारी विधानसभा निवडणुकीचा आपला वचननामा जाहीर केला. मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्यासह कोळी बांधवांचा त्यांना हवा असणारा विकास, गृहनिर्माण धोरण ठरवणे, मुंबईसारखाच महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास, मुंबईतील पळवलेले वित्तीय केंद्र नव्याने धारावीत उभारू अशी विविध आश्वासने ठाकरे गटाने या वचननाम्याद्वारे दिली आहेत. विशेषतः मुंबईकरांना सागरी पुलाचे दिलेले वचन पूर्ण केल्याचा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला. या जाहिरनाम्याद्वारे उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह महाराष्ट्राच्या सर्वांगिन विकासाचा शब्द देत कोळी बांधवांना त्यांना हवा असणारा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. ठाकरे गटाचा हा जाहिरनामा पॉकेट साईज अर्थात खिशात मावणारा आहे. त्यावर एक क्यूआर कोड असून, तो स्कॅन केल्यानंतर मतदारांना तो आपल्या मोबाईलच्या स्क्रिनवर पाहता येणार आहे.
पॉकेट साईज वचननाम्यावर क्यूआर कोड-
उद्धव ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचा निवडणूक जाहिरनामा लवकरच जाहीर केला जाईल. पण तत्पूर्वी आम्ही आमचा वचननामा जाहीर करत आहोत. कालच आम्ही आमची पंचसूत्री जाहीर केली. आमच्या व महाविकास आघाडीच्या वचननाम्यात फारसे अंतर नसेल. आमच्या पक्षाने यापूर्वी जी आश्वासने दिली होती ती सर्व पूर्ण केली आहेत. आमचा वचननामा 2 प्रकारचा असेल. त्यात क्यूआर कोडही असेल. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर मतदारांना आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरच आमचा वचननामा दिसेल. शिवसेनेने मुंबईकरांना सागरी पुलाचे आश्वासन दिले होते. आम्ही हे आश्वासन पूर्ण केले आहे.
आमचा पक्ष कोळी समाजाची ओळख मिटू देणार नाही. या समाजाला मान्य असेल असा त्यांचा विकास साधता येईल. कोळी समाजाच्या क्लस्टर विकासाचा जीआर आमचे सरकार आल्यानंतर रद्द केला जाईल. तसेच आमचे सरकार मुलांनाही मुलींसारखेच मोफत शिक्षण देईल, असे ठाकरे म्हणाले.
धारावीत वित्तीय केंद्र उभारणार-
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यातील महायुती सरकारवरही निशाणा साधला. ते म्हणाले, राज्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे. पण सध्याचे मिंधे सरकारच्या कारभारात याविषयीची कोणतीही तरतूद दिसत नाही. त्यांनी केवळ गद्दारांना नोकऱ्यांना दिल्या. सर्वसामान्य जनतेला काहीच दिले नाही. पण आमचे सरकार महाराष्ट्रातील भूमिपूत्रांना, मुला-मुलींना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल. या सरकारने मुंबईतील वित्तीय केंद्र गुजरातला पळवून लावले. पण आम्ही हे केंद्र धारावीत उभे करून तेथील जनतेला रोजगार उपलब्ध करून देऊ.
राज्यात मुलींना मोफत शिक्षण दिले जात आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण आमचे सरकार आल्यानंतर मुलांनाही मुलींसारखेच मोफत शिक्षण दिले जाईल. आमचा 5 जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न असेल, असे ते म्हणाले.
खाली पाहू वचननाम्यातील प्रमुख आश्वासने
संस्कार – प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधले जाईल.
अन्नसुरक्षा – शेतकऱ्यांचे नुकसान होऊ न देता गहू, तांदूळ, डाळ, तेल व साखर या जीवनावश्यक वस्तूंचे भाव 2 वर्षे स्थिर ठेवले जातील.
महिला – महिलांना मिळणाऱ्या सरकारी अर्थसहाय्यात वाढ केली जाणार. प्रत्येक पोलिस स्टेशन बाहेर आठवड्यातील 24 तास सुरू राहणारी महिला पोलिस चौकी स्थापन केली जाईल. अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांच्या वेतनात वाढ करणार.
आरोग्य – प्रत्येक कुटुंबाला 25 लाखांपर्यंतची कॅशलेस मेडिकल ट्रीटमेंट उपलब्ध करून देणार.
शिक्षण – जात – पात – धर्म – पंथ न पाहता महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलाला मोफत शिक्षण देणार.
पेन्शन – सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करणार.
शेतकरी – विक्रमी 50 हजार कोटींचे पॅकेज देऊन पिकाला हमीभाव देणार.
वंचित समूह – समाजातील वंचित समूहांना सक्षम व स्वावलंबी बनवणार.
रोजगार – भूमिपूत्रांना स्थानिक उद्योगांत सर्वोच्च प्राधान्य मिळेल असे धोरण राबवणार. अधिकचे औद्योगिक केंद्र उभारले जातील.