आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला:उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर घणाघात; राज यांचा सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख….

Spread the love

*मुंबई-* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या विजयी मेळाव्यातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच्यावर सडकून टीका केली. आमच्यात (राज व उद्धव) असणारा आंतरपाट आज अनाजीपंतांनी दूर केला. आम्ही एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी. हे पाहून अनेक बुवा- महाराज आज बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, तर कुणी गावी जाऊन अंगारे-धुपारे करत आहेत. कदाचित रेडेही कापत असतील, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही सत्ताधारी भाजपला दिला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले खाली वाचा जशास तसे…

उद्धव ठाकरे म्हणाले, आज बऱ्याच वर्षांनंतर राज व माझी भेट व्यासपीठावर झाली. आता पंचाईत अशी आहे की, ते मला सन्माननीय उद्धव ठाकरे असे म्हणाले… आणि साहजिकच आहे की, त्यांचेही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिले आहे. म्हणून मी माझ्या भाषणाची सुरूवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी, हिंदू बांधवांनो, भगिनीनो व मातांनो. राज यांनी अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची गरज आहे असे मला वाटत नाही. आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर, सर्वांचे लक्ष या भाषणाकडे आहे. पण आज आमच्या भाषणापेक्षा आमचे एकत्र दिसणे महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आज सर्वांनी मराठी भाषेसाठी वज्रमुठ दाखवली. महादेवराव जानकर यांनाही मी बऱ्याच वर्षांनी पाहिले.

आमच्यातील आंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला….

पण एक गोष्ट नक्की, की आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. आता अक्षता टाकण्याची काही तुमच्याकडून अपेक्षा नाही. एकत्र आलोत. एकत्र राहण्यासाठी… मला कल्पना आहे की, अनेक बुवा, महाराज हे बिझी आहेत. कुणी लिंबू कापतंय, कुणी टाचण्या मारतंय, कुणी गावी जाऊन अंगारे धुपारे करत असेल, रेडे कापत असतील. त्या सर्वांना सांगतो की, या भोंदूपणाविरोधात आमच्या आजोबांनी लढा दिला होता. त्यांचे वारसदार म्हणून आम्ही तुमच्यापुढे उभे टाकलो आहोत.

ते पुढे म्हणाले, भाषेवरून एखादा विषय निघतो, तेव्हा तो केवळ वरवरचा धरून चालणार नाही. मधल्या काळात अगदी दोघांनी म्हणजे मी व राज काय आपण सर्वांनी या नतदृष्टांचा अनुभव घेतला आहे. वापराये आणि फेकून द्यायचे. आता आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. आजपर्यंत वापर करून घेतलात, अरे डोक्यावर शिवसेनाप्रमुख नसते तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत होते. कोणत्या भाषेत बोलत होतात. राज यांनी सर्वांच्या शाळा काढल्या, पण मोदींची शाळा कोणती? सर्वात उच्चशिक्षित आहेत….

भाजप ही अफवांची फॅक्टरी….

पण हे जे काही मध्यंतरी बोललो तसे भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे. मधल्या काळात त्यांनी सुरू केले होते की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्व ही काही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही. आम्ही अस्सल मराठी बोलणारे तुमच्याहून जास्त कट्टर देशाभिमानी हिंदू आहोत. तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवता? 1992-93 साली जे काही घडले, तेव्हा आमच्या शिवसैनिकांनी अमराठी माणसांना वाचवले.

उद्धव म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी भाषेच्या आधारावर गुंडगिरी सहन करणार नाही असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस न्याय मागण्यासाठी आंदोलन करत असेल आणि त्याला तु्म्ही गुंड म्हणत असाल तर आम्ही गुंडच आहोत. आहोत आम्ही गुंड. न्याय मागणे म्हणजे गुंडगिरी नाही. तुमच्या दरबारात गुंडगिरी केल्याशिवाय न्याय मिळत नसेल तर आम्ही गुंडगिरी करू. पण हे सगळे राजकीय बाटगे. देवेंद्र फडणवीस यांचे आजचे हे विधान संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीवेळी स. का. पाटील यांनी केलेले एक विधान मला आठवते.

दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे बाटगे….

दिल्लीत बसलेल्यांचे पाय चाटणाऱ्यांना मी बाटगे म्हणतोय. मुंबई आपण मराठी माणसांनी मिळवली. तेव्हाही तत्कालीन सत्ताधारी मुंबई मराठी माणसांना देण्यास तयार नव्हते. तेव्हाही मराठी माणूस एकजूट आला. आज ते मराठी असल्याचा दावा करतात. पण ते केवळ नावाने मराठी आहेत. तुमच्या अंगात मराठी रक्त आहे की नाही हे आता तपासावे लागेल. स का पाटील बोलले होते, मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळणार? झुकवल. वाकवल. गुडघ्यावर आणले. मराठी माणसांनी लढून आपल्या हक्काची मुंबई मिळवली, असे ते म्हणाले.

कशासाठी हा सगळा घोळ तुम्ही घालत आहात. काश्मीरमधील कलम 370 हटवण्यासाठी शिवसेनेने पाठिंबा दिला. तेव्हा यांनी एक निशाण, एक प्रधान, एक विधान ही घोषणा दिली होती. बरोबर आहे. देश एक असला पाहिजे, संविधान एक असले पाहिजे. निशाणही एकच असले पाहिजे, ते म्हणजे आपला तिरंगा असला पाहिजे, भाजपचे भांडी पुसण्याचे फडके असू नये. हे फडके म्हणजे आपला राष्ट्रध्वज नाही.

त्यांनी आता एक नवीन टुमणे काढले आहे, वन नेशन वन इलेक्शन. म्हणजे हळुवारपणे सगळे एकेक करत हिंदी, हिंदू, हिंदुस्तान… हे आम्हाला हिंदू आणि हिंदुस्तान मान्य आहे, पण हिंदीची सक्ती आम्हाला मान्य नाही. तुम्ही कितीही समित्या लावा, हिंदीची सक्ती तुमच्या 7 पिढ्या आल्या तरी आम्ही करू देणार नाही, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.

मी महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली…

ते पुढे म्हणाले, आता हे आमच्याविरोधात फेक नरेटिव्ह पसरवत आहेत. हे उद्धव ठाकरे यांच्याच काळातले. उद्धव ठाकरे एवढे काम करत होता तर पाडले कशाला गद्दारी करून? का नाही बोंबलात तेव्हा, पण मी अभिमानाने सांगेन की, माझ्या मंत्रिमंडळातील सहकारी इथे बसलेत. मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रात मराठीची सक्ती केली होती. त्याचा मला अभिमान आहे. काय केले त्याचे तुम्ही. महाराष्ट्रात मराठीची सक्ती का करावी लागली? कोण आमच्या मराठीचे दुश्मन आहेत. पण महाराष्ट्रात मराठीची सक्ती केल्यानंतरही काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नव्हे काय.

आता कोण तरी भेडिया (सुशील केडिया) ही यांची पिलावळ आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा. आपण ज्या काही गोष्टी केल्या होत्या. शिवसेनेने काय केले? असा प्रश्न ते करत आहेत. राज आता तुला मी एकत्र घेतो, कारण तेव्हा ही आपण एकत्र होतो आणि यापुढेही आपण एकत्रच राहणार आहोत. त्यामुळे आपले सगळे तेव्हाचेच… मराठी माणूस म्हणे मुंबईबाहेर नेला. मराठी माणूस आम्ही मुंबईबाहेर नेला असे तर तुम्हाला वाटत असेल, तर 2014 नंतर तुम्ही जे काही महाराष्ट्र व मुंबईचे लचके तोडलेत, महाराष्ट्रातून सर्वच उद्योगधंदे बाहेर पळवले. आर्थिक केंद्र गेले. हिरे व्यापार गेले. मोठमोठी ऑफिस गेली. आपल्या काळात महाराष्ट्रात उद्योदधंदे येत होते, ते कुठे गेले? मग काय तेवढाच हिंदुस्तान आहे किंवा तेवढेच हिंदू आहेत? आम्ही सर्वकाही करत होतो. केले होते. पण तुम्ही आमच्यात गद्दारी करवलीत. आमचे सरकार पडलेत. तिकडे तुमचे जे दोन मालक बसलेत व्यापारी, त्यांच्यासाठी तुम्ही हे सर्व करत आहात.

आता आपल्यात भांडणे लावली जातील…

आपल्या डोळ्यादेखत हे लचके तोडले जात होते. आपल्या दोघांनाही भांडवले जात आहे आणि हे नतदृष्ट आपल्या डोक्यावर बसत आहेत. हे किती वर्षे सहन करायचे. प्रत्येकवेळी काही झाले की, भांडाभांडी लावायची. आता सुद्धा तेच होणार. म्हणजे आम्ही एकत्र येणार आणि आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील का? असे म्हणणार. काही जण म्हणत आहेत की, यांचे म मराठीचे नाही तर महापालिकेचे आहे. अरे, नुसता महापालिकेचे नाही तर महाराष्ट्राचे आहे. आम्ही महाराष्ट्रसुद्धा काबिज करू. आज निवडणुका नाहीत. सत्ता येते आणि जाते. पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे. दरवेळी संकट आले की, आपण सर्व मराठी एकवटतो आणि संकट गेले की आपणच एकमेकांशी भांडतो. पण आता असा नतदृष्टपणा अजिबात करायचा नाही.

कारण मागील विधानसभेत त्यांनी जे काही केले ते बटेंगे तो कटेंगे. आपल्याला वाटले हे हिंदू-मुस्लिम करतील. त्यांनी हे केलेच. पण त्यांनी हे मराठी व मराठीतेतर यांच्यात केले. यांचे हेच धोरण आहे. त्यांनी जे गुजरातमध्ये केले ते महाराष्ट्रात केले. गुजरातमध्ये मागच्यावेळी असे वातावरण केले की, पटेल यांना आपटेल अशी स्थिती निर्माण झाली होती. पण त्यांनी पटेलांना भडकावून पटेलेतरांना एकत्र केले. त्यांनी हरियाणातही तेच केले. जाट लोकांना भडकावून त्यांनी जाटेतरांना एकत्र करून सत्ता मिळवली. महाराष्ट्रातही त्यांनी तेच केले. मराठींना उचकवले आणि मराठेतरांना एकत्र करून सत्ता प्राप्त केली. मराठी माणूस आपसात भांडले आणि दिल्लीचे गुलाम आपल्यावर राज्य करायला लागले.

आपण त्यांच्या पालख्या वाहायच्या. नुसत्या पालख्यांचे भोई होणार की कधी तुम्ही आपल्या मराठीला सन्मानाने पालखीत बसवणार आहात? बस झाले. यांची जोखडे आता फेकून द्या. एकमेकांशी भांडून त्यांचे जे काही डाव असतात ते साधतात.

काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना…

आमचे पंतप्रधान जगभर फिरत आहे. काय तो मोठा पट्टा घातलाय स्टार ऑफ घाना… कुठे आला घाना देश? इकडे घाण व तिकडे स्टार ऑफ घाणा… पण एका बाजूला मोदींचा फोटो व दुसऱ्या बाजूला माझ्या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्याला बैलही मिळत नाही. त्यामुळे त्याच्यावर जू खांद्यावर घेऊन शेती करत आहे. याची त्यांना लाज वाटली पाहिजे.

आज पेपरमध्ये बातमी आली आहे. लाडक्या बहिणींचे पोर्टल बंद झाले आहे. बसा बोंबलत आता. त्याहून अधिक भयानक गोष्ट म्हणजे आपल्या देशात सर्वात कर्जबाजारी शेतकरी कुठे असतील तर ते आपल्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र आता थांबणार नाही, कर्ज काढतच राहणार. ही यांची जी काही खेळी आहे, आपसात भांडणे लावून द्यायची. मी एक साधी गोष्ट केली होती की, आपण चौपाटीला मराठी रंगभूमीचे दालन उभे करण्याचा निर्णय घेतला होता. आपण सर्व आराखड्याला मंजुरी दिली होती. पण 2-3 महिन्यांपूर्वी यांनी तो आराखडा केराच्या टोपलीत टाकून ती जागा यांनी त्यांच्या मालकाच्या घशात टाकली. हा त्यांचा मराठी अभिमान आहे.

मराठी भाषा भवनाचे भूमीपूजन मी केले होते. माझ्या सोबत उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार होते. कुठे गेले मराठी भाषा भवन? कुठे गेले मराठी रंगभूमीचे दालन? का तुम्ही आमची मराठी मारत आहात. का तुम्ही आमच्यावर सक्ती करत आहात. अनेकदा सांगितले की, आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही. पण आमच्यावर सक्ती करण्याचा प्रयत्न केला, तर एकदा आमची शक्ती तुम्हाला अशी दाखवू की तुम्ही पुन्हा आपले डोके वर काढणार नाही.

पंतांचा धंदाच आहे काड्या घालण्याचा

आज एकत्र आलो आहोत. पुन्हा आपल्यात काड्या घालण्याचे काम होईल. पंतांचा धंदाच तो आहे. कुणाच्याही लग्नाला भाजपवाल्यांना बोलावू नका. ते येतील श्रीखंड, बासुंदी खातील आणि नवरा बायकोत भांडणे लावून दुसऱ्या लग्नाला जेवायला जातील. बरे एवढे केले तर पुरे. पण ते पोरीलाच पळवून घेऊन जातील. कारण, यांचे स्वतःचे असे काहीच नाही. भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही तो नव्हता. भाजप हा सर्वात शेवटी आला आणि 57 ची निवडणूक झाली की हे सर्वात अगोदर बाहेर पडले. तेव्हा त्यांचे नाव जनसंघ असे नाव होते. आम्ही त्यांच्याकडून देशाभिमान व महाराष्ट्राभिमान शिकायचा का? हे लोक मुंबईच्या चिंधड्या उडवत आहेत. अख्खी मुंबई एका व्यक्तीच्या घशात घालत आहेत. आपण केवळ बघत बसायचे का. आज मुंबईतील सर्वात जास्त जागेचा कुणी मालक असेल तर तो यांच्या मालकाचा मित्र आहे तो म्हणजे अदानी.

कुणाची जागा, कुणी रक्त सांडले. हुतात्माच्या बलिदानाने मिळालेली मुंबई आपण राखू शकणार नसू, तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. त्यामुळे आपण रक्ताची शपथ घेऊन आपण मुंबई व मराठीच्या रक्षणासाठी उभे राहिले पाहिजे. यापुढे आम्ही मराठी व महाराष्ट्र धर्माचे रक्षण करणार.

मारुती स्त्रोत आम्हाला का विसरवायला लावता?

आमचा हनुमान चालिसाला विरोध नाही. पण मारुती स्त्रोत आम्हाला का विसरवायला लावता? आमचा जय श्रीरामला विरोध नाही. पण भेटल्यानंतर राम-राम हे म्हणणारे आम्हीच मराठी आलोत. तुम्ही आता जय श्रीरामची घोषणा देत आहात. पण जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास त्यावेळी होऊन गेलेत, त्यांनी आम्हाला पहिल्यांदा रामाची भक्ती शिकवली. त्यामुळे यांचा काहीच आगापिच्छा नाही. राजकारणातले हे व्यापारी आहेत. वापरा आणि फेका.

तो काल एक गद्दार बोलला जय गुजरात. किती लाचारी करायची. पुष्पा पिक्चरमधला हिरो झुकेगा नही साला असे म्हणतो. पण हे लोक उठेगा नही साला असे म्हणतात. कुछ भी बोलो उठेगाही नही. अरे कसे उठणार, आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखे. म्हणजे विचार मी म्हणतोय… हिंदी भाषेला विरोध न करणारा माणूस बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक असू शकेल. आपला मालक आला म्हणून त्याच्यापुढे जय गुजरात म्हणणारा आपल्या बाळासाहेबांचा पाईक असू शकेल. मग आता उघडा डोळे बघा नीट. आता जर का डोळे उघडले नाही तर पुन्हा कधी उघड्याची वेळ येणार नाही. कायमचे मिटून जातील.

आत्ताच डोळे उघडा. आत्ताच जागे व्हा. आत्ता आलेली जाग जाणार असेल तर मग मराठी आईची मुले म्हणू नका. एक तर कुणावर अन्याय करू नका. पण तुमच्या अंगावर कुणी हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका. देवेंद्र फडणवीस भाषिक गुंडगिरी सहन करणार नाही असे तुम्ही म्हणत आहात. तुम्ही मला दुसऱ्या राज्यात जाऊन गुंडगिरी करणारा एक मराठी माणूस दाखवा. पण तुमचे चेलेचपाटे उठून कुणावरूनही आरोप करून तमाशे करत आहेत. यापुढे मराठी माणसांनी एकजूट ठेवावी. अगदी भाजपमधील मराठी माणसांनीही यात आले पाहिजे, असे ते म्हणाले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page