‘लोक माझे सांगाती’ पुस्तकात शरद पवारांनी काय लिहिलंय?
लोक माझे सांगाती या पुस्तकात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंविषयी नेमकं काय म्हटलं आहे?
मुंबई- लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या आत्मचरित्राची दुसरी आवृत्ती आज प्रकाशित झाली. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. मात्र या दुसऱ्या आवृत्तीत उद्धव ठाकरेंबाबत शरद पवार यांनी केलेला उल्लेख चर्चेत आहे.
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंविषयी?
उद्धव ठाकरे यांनी फक्त दोनवेळा मंत्रालयात जाणं हे आमच्या फारसं पचनी पडणारं नव्हतं. रश्मी ठाकरेंशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीचं वर्तमान समजत होतं. मी वडिलकीच्या नात्याने त्यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. उद्धव ठाकरे यांची प्रकृती, त्यांच्या डॉक्टरांच्या वेळा यामुळे त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावी लागत होती. असा उल्लेख शरद पवार यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात केला आहे.
पुढे शरद पवार या पुस्तकात म्हणतात…
राज्याच्या प्रमुखाला राज्यातल्या घडामोडींची बितंबातमी हवी. काय घडतंय यावर बारीक लक्ष हवं. उद्या काय होऊ शकेल याचा अंदाज घ्यायची क्षमता हवी आणि त्यानुसार आज काय पावलं उचलली पाहिजेत? हे ठरवायचं राजकीय चातुर्य हवं. या सगळ्याच बाबतीत आम्हाला कमतरता जाणवत होती. अनुभव नसल्याने हे सगळं घडत होतं तरीही हे टाळता आलं असतं असंही शरद पवारांनी या पुस्तकात म्हटलं आहे.
राजेश टोपेंची कामगिरी स्पृहणीय
राजकारणात सत्ता राखण्यासाठी वेगानं हालचाली कराव्या लागतात. परंतु ‘महाविकास आघाडी सरकार कोसळण्यापूर्वी निर्माण झालेल्या पेचप्रसंगात त्यांनी पहिल्याच टप्प्यात माघार घेतली. त्याचंही कारण शारीरिक अस्वास्थ्य हेच असावं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बहुतेक सर्व मंत्री मुरब्बी असल्यामुळे, त्यांना दांडगा प्रशासकीय अनुभव असल्यामुळे, अशाही काळात सरकार कृतिशील राहिलं. अजित मंत्रालयात कायम उपलब्ध असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला निर्णयप्रक्रियेमध्ये काळजी करण्याची आवश्यकता भासली नाही. करोनाच्या अभूतपूर्व संकटात वास्तविक महाराष्ट्र हॉटस्पॉट असूनही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी त्या वेळी केलेली कामगिरी फारच स्पृहणीय होती. राजेश सर्व निर्णयांवर चौफेर लक्ष ठेवून होता. उद्धवही प्रशासनाच्या संपर्कात होते, परंतु ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे. राजेश आणि राष्ट्रवादीचे सारे मंत्री प्रत्यक्ष मैदानात सक्रिय होते. आपल्या विचारांच्या हातात राज्य असताना संकटग्रस्त स्थितीत समाजाला दिलासा देण्याची नैतिक जबाबदारी आपलीच आहे, याच भावनेतून माझ्यासह सर्व सहकारी काम करत होते असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महाविकास आघाडी हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता
‘महाविकास आघाडी’चं सरकार हा फक्त सत्तेचा खेळ नव्हता. अन्य पक्षांना दडपून टाकत, लोकशाहीतल्या इतर पक्षांचं महत्त्व येनकेन प्रकारेण संपवत राजकीय वर्चस्व निर्माण करण्याच्या भाजपाच्या वृत्तीला ते सडेतोड उत्तर होतं. ‘महाविकास आघाडी’चं सरकार हे भाजपाला देशभरात मिळालेलं सर्वात मोठं आव्हान होतं. हे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न होणार, याची कल्पना होतीच. आम्ही आमच्या पातळीवर असे डावपेच हाताळायला भक्कम होतो. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यानं शिवसेनेतच वादळ माजेल, याचा मात्र आम्हाला अंदाज नव्हता. हा असंतोषाचा उद्रेक शमवायला शिवसेना नेतृत्व कमी पडलं, संघर्ष न करता उद्धवनी राजीनामा दिल्यामुळे ‘महाविकास आघाडी’च्या सत्तेला विराम मिळाला. राजकारणातल्या अतर्क्यतेचा आणखी एक अनुभव गाठीशी जमा झाला.