
मालेगाव : स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. त्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिला आहे. आपण देशातील लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. पण, सावरकर यांचा अपमान सहन करणार नसल्याचे उद्धव यांनी म्हटले. मागील काही दिवसांपासून राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केला असल्याचा मुद्दा शिवसेना-शिंदे गट आणि भाजपने उपस्थित केला आहे. त्यातून शिवसेना ठाकरे गटाची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर भाष्य केले.
नाशिकमधील मालेगाव येथील जाहीर सभेला आज उद्धव ठाकरे यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, राहुल गांधी यांची शनिवारची पत्रकार परिषद चांगली झाली. त्यांनी त्यात चांगले मुद्दे उपस्थित केले होते. मात्र, त्यांनी सावरकर यांचा अपमान करू नये. स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत आहे. आम्ही दैवताचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना दिला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले ते येड्या गबाळेचे काम नाही. सावरकरांनी 14 वर्ष छळ सोसला. जसे आपले क्रांतीकारक बळी गेले, तशाच मरण यातना सावरकर 14 वर्ष सोसत आहे. आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र लढत आहोत. त्याला फाटे फोडू नका असे आवाहनही ठाकरे यांनी केले. आम्ही सावरकर भक्त आहोत. भाजपमध्ये काही सावरकर भक्त आहेत तरी काही अंध भक्त झालेत असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.