*मुंबई-* सचिन वाझे याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना परत पोलिसात घेण्यात आले होते. शिवाय त्याचावर टीका होऊ लागताच वाझे काय लादेन आहे का? असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी विचारला होता. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी केली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या, निलंबित असलेल्या वाझेला अनिल देशमुख तुम्हीच पोलिस दलात पुन्हा घेतले ना? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात भाजप नेते केशव उपाध्ये यांनी दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात बोलायला हवे, असे आवाहन देखील उपाध्ये यांनी केले आहे. तर त्यांनी आपल्य दुसऱ्या पोस्टमध्ये अनिल देशमुख यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देशमुखांच्या दृष्टीने वाझे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, तर राऊत यांच्या दृष्टीने वाझे दहशतवादी आहे. पण तुम्ही त्याला पोस्टिंग दिली त्यावेळी तो तुमचाच ब्लू आइज बॉय होता ना मग अचानक यु टर्न का? असा प्रश्न उपाध्ये यांनी विचारला आहे.
*केशव उपाध्ये यांची पहिली पोस्ट*
सचिन वाझे : अनिल देशमुख हे PA च्या माध्यमातून वसुली करत होते. सर्व गोष्टींचे पुरावे आहेत. देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सर्व कळवले. काल परवा पर्यंत अनिल देशमुख माध्यमांसमोर येऊन जे बोलत होते, त्याचा एकच अर्थ आहे, चोराच्या उलट्या बोंबा… बाकी दमदाटी, दबाव आणणे, पेन ड्राईव्ह हे किती निरर्थक होतं, हे तीनच दिवसांत बाहेर आलं. उध्दव ठाकरे यांनी सुध्दा बोलल पाहिजे, कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांचा मंत्री मंडळातील मंत्र्यावर आरोप केलेत ते सुध्दा वाझे यांनी याच सचिन वाझेस ठाकरे मुख्यमंत्री असताना परत पोलिसात घेतले शिवाय त्याचावर टीका होऊ लागताच वाझे काय लादेन आहे का असा प्रश्न उध्दव ठाकरे यांनी विचारला होता. या प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी.
*केशव उपाध्ये यांची दुसरी पोस्ट-*
सचिन वाझेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा साक्षात्कार अनिल देशमुखांना आज का झाला? मग गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या निलंबित असलेल्या वाझेला अनिल देशमुख तुम्हीच पोलीस दलात पुन्हा घेतलेत. नुसतेच घेतले नाहीतर त्याला थेट मुंबई पोलीस आय़ुक्तालयात गुन्हे शाखेत प्रमुखपदी नेमणूक कशी दिलीत? त्याला थेट मुंबई आयुक्तांना रिपोर्ट करण्याचे विशेष आदेश आपणच दिले होते ना, मग त्यावेळीही त्याला गुन्हेगारी पार्श्वभूमी होतीच ना! देशमुखांच्या दृष्टीने वाझे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा, तर राऊत यांच्या दृष्टीने वाझे दहशतवादी…..त्यावेळी तो तुमचाच ब्लू आइज बॉय होता ना मग अचानक यु टर्न !