कोल्हापूर- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी भाजपसह राज्यातील महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. मी मुख्यमंत्रीपदी असताना महाराष्ट्राच्या हक्काचा एक कणही कुणाला देत नव्हतो. एवढा दरारा मी दिल्लीत निर्माण केला होता. यामुळेच त्यांनी आपले सरकार पाडले, असे ते म्हणालेत. ठाकरे यांनी यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांना मुलींसारखेच मोफत शिक्षण देण्याची ग्वाहीही दिली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आता उडाला आहे. उद्धव ठाकरे यांची मंगळवारी कोल्हापूरच्या राधानगरी – भुदरगड मतदारसंघात सभा झाली. या सभेतून त्यांनी भाजप व महायुती सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मी मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मी महाराष्ट्राच्या हक्काचा एक कणही कुणाला देत नव्हतो. एवढा दरारा मी त्यावेळी दिल्लीत निर्माण केला होता. यामुळेच त्यांनी आपले सरकार पाडले. पण आता त्यांना महाराष्ट्र विकायचा आहे. सर्वकाही गुजरातला न्यायचे आहे. गद्दारी करून सर्वकाही विकले जात आहे.
उद्धव ठाकरेंची जनतेला 5 महत्त्वाची आश्वासने..
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांना मोफत उच्च शिक्षणासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यासंबंधीची 5 महत्त्वपूर्ण आश्वासने दिली. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या तुलनेत ही आश्वासने महाविकास आघाडीसाठी गेमचेंजर ठरणार असल्याचा दावा केला जात आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारकडून राज्यातील विद्यार्थिनींना मोफत शिक्षण दिले जाते. पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मुलांनाही मोफत शिक्षण दिले जाईल. मुलगा व मुलगी हे दोघेही कुटुंबाचे आधारस्तंभ असतात. त्यामुळे मुलांनाही मोफत शिक्षण मिळणे काळाची गरज आहे.
पोलिस ठाण्यात गेल्यानंतर महिलांना अनेकदा तक्रार कुठे करायची हेच कळत नाही. त्यामुळे मविआचे सरकार आल्यास राज्यात तातडीने महिला पोलिसांची भरती केली जाईल. राज्यात विविध ठिकाणी पोलिस ते वरिष्ठ पदांवर महिला अधिकारी कार्यरत असणारे विशेष पोलिस ठाणे सुरू केले जाईल.
उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील अदानी यांचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करून त्या ठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे देण्याचेही आश्वासन दिले. तसेच राज्यातील गावखेड्यातील लोकांना मुंबईत येण्याचेही आवाहन केले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास अदानींचा धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल. त्या ठिकाणी धारावीकरांना उद्योगधंद्यांसह घरे दिले जातील. मुंबई सर्वांची आहे. मराठी माणसांची आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेने मुंबईत यावे. मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवली आहे. त्यामुळे मुंबईवर त्यांचा पहिला हक्क आहे. धारावी व मुंबई परिसरात भूमिपूत्रांना माफक दरात घरे उपलब्ध करून दिले जातील, असे ते म्हणाले.
आमचे सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांना हमीभाव दिला जाईल. विशेषतः महाविकास आघाडीचे सरकार पडले नसते तर यंदाच्या वर्षी शेतकरी कर्जमुक्त झाला असता. पण आता आम्ही सत्तेत नाही. उद्या सत्तेत आल्यानंतर पुन्हा शेतीमालाला हमीभाव दिला जाईल.
मविआ सरकारच्या काळात 5 वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर होते. आता पुन्हा आमची सत्ता आल्यास महाराष्ट्रात पुढील वर्षे जीवनावश्यक वस्तुंच्या दरात कोणताही बदल केला जाणार नाही. डाळ, तांदूळ, साखर, तेल आदी वस्तुंचे भाव स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
1500 रुपयांवर कुणाचे घर चालते?…
उद्धव ठाकरे म्हणाले, मी अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोणती चूक केली हे मला सांगा. मी सर्वकाम करून दाखवली. त्यानंतरही आमचे सरकार पाडण्यात आले. मी अडीच वर्षे जे भोगले ते आज मांडण्यासाठी येथे आलो आहे. राज्यातील विद्यमान सरकार संधी मिळेल तिथे खात आहे. प्रकल्पाच्या नावाखाली कंत्राटदारांचे खिसे भरत आहे. निवडणुकीच्या तोंडावर या सरकारला लाडकी बहीण दिलील. पण 1500 रुपये देऊन कुणाचे घर चालते हे सांगावे, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील 15 दिवस देशभरातील आपल्या नेत्यांना आणून महाराष्ट्रात रहावे आणि पराभव झाल्यानंतर पुन्हा निघून जावे, असेही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले.