
मुंबई- दिशा सालियनच्या वडिलांनी आज मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या मुलीच्या हत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी करत या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना वाचवण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा आरोप त्यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांचा ड्रगजच्या व्यापारात हात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या आरोपांमुळे राज्याचे राजकारण अधिकच तापण्याची चिन्हे आहेत.
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. पण ही आत्महत्या होती की हत्या? यावरून बरेच राजकारण रंगले आहे. पण आता दिशाचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून आपल्या मुलीची सामूहिक अत्याचारानंतर हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी मंगळवारी मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांची भेट घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांशी बोलताना त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात उद्धव ठाकरे यांनाही सहआरोपी करण्यात आल्याचे सांगितले.
आरोपींमध्ये कुणाकुणाचा सहभाग?…
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, आम्ही आमची तक्रार मुंबईच्या अतिरिक्त पोलिस आयुक्तांकडे (गुन्हे) दिली आहे. त्यांनी सीपींशी चर्चा करून आमची तक्रार दाखल करून घेतली आहे. आता आरोपींना केव्हा अटक करणार? याची जबाबदारी पोलिसांवर आहे. आरोपींमध्ये आदित्य ठाकरे, डिनो मोरिया, सुरज पंचोली, त्यांचे अंगरक्षक, परमबीर सिंह, सचिन वाझे, रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.
परमबीर सिंह यांनी हे प्रकरण दाबण्याच्या प्रकरणातील मुख्य मास्टरमाईंड आहेत. परमबीर यांनी या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्यानंतर कव्हरअप करण्यासाठी एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटनास्थळी कोणताही राजकारणी आला नसल्याचा दावा केला. पण मोबाईल टॉवरच्या लोकेशनपासून प्रत्यक्षदर्शींच्या जबाबापर्यंत सर्वच गोष्टी त्यांचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करतात. इतरही अनेक गोष्टी आमच्या तक्रारीत नमूद आहेत. या गोष्टी संपूर्ण देशासाठी धक्कादायक आहेत.
आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग…
आदित्य ठाकरे यांचा ड्रग्जच्या व्यापारात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची माहिती आम्ही यात दिली आहे. आदित्य ठाकरे व डिनो मोरिया यांच्या फोनवरील रेकॉर्डिंगचाही यात समावेश आहेत. या सर्वांचा नार्कोटिक्स ब्युरोने ड्रग्ज प्रकरणात आरोपी बनवलेल्या समीर खानशी संबंध आहे. हा एक मोठा विषय आहे. त्यावर सरकारने उत्तर द्यावे. आदित्य ठाकरे यांचा ड्रग्ज प्रकरणात समावेश असताना त्यांना अटक करण्यापासून कुणी रोखले व त्यात किती कोटींची डील झाली होती हे त्यांनी सांगावे, असे नीलेश ओझा म्हणाले. दिशा सालियनचा मित्र स्टिव्ह पिंटो अद्याप बेपत्ता असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उद्धव ठाकरेंनी पदाचा दुरुपयोग केला…
पत्रकारांनी यावेळी नीलेश ओझा यांना या प्रकरणात तुम्ही उद्धव ठाकरे यांना आरोपी केले काय? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी हो असे सकारात्मक उत्तर दिले. ते म्हणाले, या प्रकरणात उद्धव ठाकरेही आरोपी आहेत. तेव्हा ते मुख्यमंत्री होते. त्यांनी आदित्य ठाकरे यांनी केलेला गुन्हा लपवण्यासाठी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा गैरवापर केला. सचिन वाझे हे त्यांच्याच गँगचे सदस्य होते. हायकोर्टाने ख्वाजा युनूस हत्या प्रकरणात सचिन वाझे यांना तुरुंगात पाठवले होते. ते 16 वर्षे निलंबित होते. पण उद्धव ठाकरे यांनी आपल्या काळात त्यांचे निलंबन मागे घेऊन त्यांना पुन्हा सेवेत घेतले. त्यांची थेट क्राईम इन्टेलिजन्स यूनिटमध्ये नियुक्त केली.
त्यानंतर त्यांनी वाझे यांच्या मदतीने याचे खून कर, त्याचा खून लपव, त्याच्याकडून खंडणी उकळ, मनसूख हिरेनला आदी अनेक प्रकारची कामे केली. उद्धव ठाकरे स्वतः सचिन वाझेचा बचाव करण्यासाठी पुढे आले. या प्रकरणात परमबीर सिंहांविरोधात थेट पुरावे आहेत. या सर्व आधारावर या लोकांना आरोपी करण्यात आले आहे, असे ओझा म्हणाले.