जनशक्तीचा दबाव न्यूज | रत्नागिरी | मे ०५, २०२३.
समाजाप्रती काम करताना, सामाजिक कार्य करताना भविष्यात नाम फाऊंडेशनचा आदर्श पुढे घेवूनच जावे लागेल, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग, जिल्हा नियोजन समिती व नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पावस येथे गौतमी नदी रुंदीकरण व खोलीकरण शुभारंभ सोहळा ज्येष्ठ अभिनेते तथा नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नाना पाटेकर व लोकप्रिय विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सुप्रसिध्द दिग्दर्शक अभिजीत पानसे, मल्हार पाटेकर यांच्यासह जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंता, वैशाली नारकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, यांत्रिक विभागाचे कार्यकारी अभियंता जावेद काझी, पावस ग्रामपंचायत सरपंच चेतना सामंत, ग्रामस्थ आणि नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, रत्नागिरीतील 7 नद्यांचा गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात येत आहे. आज कोकणामध्ये प्राधान्याने करावयाचे काम म्हणजे नद्यांमधील गाळ काढणे, तेथील जनतेला, वाडया-वस्तींना पूर समस्येपासून सुरक्षित करणे, हे आहे. गेल्या काही वर्षांपासून हे काम नाम फाऊंडेशन धडाडीने करीत आहे. त्यामुळे समाजाप्रति सामाजिक कार्य करताना भविष्यात नाम फाऊंडेशनचा आदर्श घेवूनच पुढे जावे लागेल.
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की , दोन वर्षापूर्वी चिपळूण शहर येथे भयंकर पूर आला होता. त्यावेळी प्रशासन आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून वशिष्ठी नदीतील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात आला. मागच्या वर्षीही आधीच्या वर्षीप्रमाणेच भरपूर पाऊस पडला परंतु यावेळी पूर आला नाही. याचे खरे श्रेय प्रशासनासोबत नाम फाऊंडेशनचे आहे. राजकारण्यांशी थेट संवाद साधणारे, त्यांना मार्गदर्शन करणारे, त्यांना सडेतोड प्रश्न विचारणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे नाना पाटेकर आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांवर संशोधन करणारे देशातील पहिले आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र हे रत्नागिरी मध्ये साकार होत आहे. त्याच्या उद्घाटनाला आपण यावे, असे निमंत्रण पालकमंत्री उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांना दिले. भविष्यात नाम फाऊंडेशन आणि शासन असे एकत्रित मिळून काही करता येईल, यासाठी आपण प्रयत्न करु. ज्या पध्दतीने आपण एक वेगळा पायंडा आपल्या कामांतून मांडलेला आहे, आदर्श उभा केला आहे, त्याचे शासनाने देखील अनुकरण करणे गरजेचे आहे आणि याच भावनेतून एखादा सामंजस्य करार (MOU) करता आला तर त्यासंदर्भात आपण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असे आश्वासन मंत्री सामंत यांनी यावेळी दिले.