रक्तदात्याचा गौरव! संगमेश्वरातील उदय कोळवणकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे सत्कार…

Spread the love

शास्त्री पूल: सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे, संगमेश्वर तसेच देवरुख येथे राहणारे आणि निरंकारी विचारसरणीचे भक्त श्री. उदय गणपत ऊर्फ बंधू कोळवणकर यांचा संगमेश्वर तालुका पत्रकार संघातर्फे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

श्री. कोळवणकर यांनी सन १९८४ पासून आजपर्यंत सतत रक्तदान व अपघातग्रस्तांना तातडीची मदत करण्याचे कार्य निःस्वार्थपणे सुरू ठेवले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा त्यांना स्वतःच्या आयुष्यातूनच मिळाली. त्यांच्या आई, कै. मालती कोळवणकर आजारी असताना रक्ताची गरज भासली होती. त्या वेळी रक्तपेढीत त्यांच्या रक्तगटाचे रक्त उपलब्ध नसल्याने त्यांनी स्वतःचे रक्त देऊन आपल्या आईचा जीव वाचवला. ही घटना त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रारंभ ठरली.

त्यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, कल्याण इत्यादी जिल्ह्यांतील असंख्य गरजू रुग्णांना विनामूल्य रक्तदान करून मदत केली आहे. आजही ते सक्रियपणे रक्तदान करतात. त्यांचे हे सातत्यपूर्ण योगदान कौतुकास पात्र आहे.

या सत्कार समारंभाचे आयोजन संगमेश्वर बाजारपेठेतील विद्याता कलेक्शन इमारतीच्या माडीवर पार पडले. कार्यक्रमात संगमेश्वर तालुका पत्रकार संघाचे सदस्य वहाब दळवी, नियाज खान, दिपक तुळसणकर, दिनेश अंब्रे तसेच संगमेश्वर येथील ज्येष्ठ नागरिक प्रमोद शेट्ये, उपाध्यक्ष उदय संसारे, खजिनदार जनार्दन शिरगावकर, व्यापारी विनय शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक क्षेत्रात निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना योग्य वेळी दिला जाणारा सन्मान समाजाला प्रेरणादायी ठरत असून, श्री. कोळवणकर यांचे कार्य युवा पिढीसाठी एक आदर्श आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page