चिपळूण :- पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यावर खड्ड्यांनी डोके वर काढले आहे. हे खड्डे सध्या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मंगळवारी दोन विद्यार्थी सायकलवरून शाळेत जाताना खड्ड्यात पडल्याची घटना घडली. सुदैवाने, त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.
चिपळूण शहरातील रस्त्यांवर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दोन वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार केलेला उक्ताड मराठी शाळा ते गुहागर नाक्यादरम्यानचा रस्ताही खड्ड्यांत गेला आहे तर अनेक ठिकाणचे रस्ते पालिकेच्या पाईपलाईनच्या लिकेजमुळे खराब झाले आहेत. या सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांवर पालिकेमार्फत तात्पुरती उपाययोजना केली जात आहे. खड्डे दगडमातीने भरले गेल्यामुळे पावसात त्यातील माती वाहून जात आहे. त्या जागेवर पुन्हा खड्डे पडत आहेत शिवाय चिखलाचेही साम्राज्य पसरलेले आहे. उक्ताड येथील रस्त्यासाठी ठेकेदाराचा हमी कालावधी असतानाही त्यांच्याकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच या भागातील खड्ड्यांवर दगडमातीचा मुलामा द्यावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाचे पाणी या खड्ड्यांत साचून राहते. परिणामी, खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने छोटे-मोठे अपघात घडत आहेत. मंगळवारी अशाच प्रकारे एक अपघात शहरातील चिपळूण अर्बन बँक ते भेंडीनाका दरम्यानच्या रस्त्यावर घडला. पालिकेचे कर्मचारी येथील खड्डे दरडमाती टाकून भरत असतानाच सायकलवरून शाळेत जाणारे दोन विद्यार्थी खड्ड्यांत कोसळले. सुदैवाने, त्यांना कोणतीही मोठी दुखापत झाली नाही; मात्र त्यांचे शाळेचे गणवेश चिखलाने माखले. यांच्यामागे मोठे वाहन नसल्याने कोणता अनुचित प्रकारही घडला नाही. स्थानिकांनी त्यांना उचलून धीर दिला. खड्ड्यांमध्ये अशा स्वरूपाचे अपघात सातत्याने घडत असल्याने नगर पालिका प्रशासनाने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.