
दिवा ( प्रतिनिधी) दिव्यात लोकल पकडण्यावरुन फलाट क्र.3 वर तुफान राडा झाला असून या हाणामारीत दोन प्रवाश्यांना बेदम मार बसला आहे.या हाणामारीनंतर दिव्यातील नागरीकांकडून मात्र निष्क्रीय सरकारच दोषी असल्याचा आरोप करण्यात येत आहे.दिव्यात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून सकाळ व संध्याखालच्या दरम्यान येथील नागरिकांना लोकल पकडणे सोपे नसल्याने या रागाच्या भरातून आतील दरवाजा अडवून बसलेल्या प्रवाश्यांना मारहाण झाल्याचे बोलले जात आहे.लोकलची ़समस्या गंभीर असूनही राज्य किंवा केंद्रशासन दिव्यातून लोकल सोडण्यास उत्सुक नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत असे बोलले जात आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर हा प्रकार सोमवारी संध्याकाळी घडला. सीएसएमटीवरुन कर्जतला जाणारी लोकल ट्रेन साधारण ७.१०च्या सुमारास दिवा स्थानकात दाखल झाली. कर्जत लोकल असल्याने या गाडीत नेहमीप्रमाणे प्रचंड गर्दी होती. या गाडीतील काही प्रवाशांना दिवा स्थानकात उतरायचे होते. मात्र, एका प्रवाशाने दरवाजा अडवून ठेवला होता. खरंतर या प्रवाशाला पुढे उतरायचे होते. दिवा स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांनी त्याला पाठीमागे जाण्यास सांगितले. मात्र, संबंधित प्रवाशाने दरवाजातून हटण्यास नकार देत वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे दिव्यातील प्रवाशी प्रचंड संतापले.