
तुळजापूर: शनिवारी, रविवार आणि त्यात सोमवारी नाताळ सणाची सुट्टी असल्याने अनेकजण सुट्टीचे नियोजन करत असतात. त्यातल्या त्यात महत्वाच्या मंदिरात या काळात भाविकांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळत असते. दरम्यान, याच सुट्टयांच्या पार्श्वभूमीवर होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता तुळजाभवानी मंदीर प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 25 ते 31 डिसेंबर या कालावधीत श्रीतुळजाभवानी मंदीर पहाटे एक वाजता चरणतिर्थ होऊन भाविकांना दर्शनार्थ खुले करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
सुट्ट्यांच्या काळात दरवर्षी तुळजाभवानी मंदीरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मंदिर प्रशासनाला देखील मोठी कसरत करावी लागते. या काळात भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण येऊन भाविकांना कमी वेळेत सुलभ दर्शन घडवण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून प्रयत्न केले जाते. रांगेतून आलेल्या भाविकांना श्रीतुळजाभवानी मूर्तीचे सुलभ मुख दर्शन घडविण्यासाठी नाताळ सुट्टीनिमित्त मोठी गर्दी होते. त्यामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने 25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल, असे स्पष्ट केले आहे.
25 डिसेंबर रोजीचे चरणतीर्थ पहाटे एक वाजता होईल.
27 ते 31 डिसेंबर दरम्यान येणारे मंगळवार, शुक्रवार, रविवार व पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळचे चरणतिर्थ पहाटे 1 वाजता होऊन पुजेची घाट सकाळी 6 वाजता होईल.
अभिषेक सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 ते 9 वाजता या वेळेत संपन्न होतील. अभिषेक कालावधीत देणगी दर्शन बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मंदीर प्रशासनाने केले आहे.
पौर्णिमाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी 25 रोजी रात्री छबिना तर मंगळवार 26 रोजी रात्री छबिना व जोगवा व बुधवार 27 रोजी रात्री छबिना काढला जाणार आहे.



