
सावंतवाडी : पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गाव जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेचे आरक्षण 20 जून 2025 पासून सुरू होणार आहे.
गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. म्हणजेच यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणार्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.

आरक्षणातील गौडबंगाल कधी उघड होणार…
खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्न्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.
दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

गणेशोत्सव विशेष गाड्यांवर लक्ष ठेवा..
गणेशोत्सव कालावधी कोकण रेल्वे प्रशासनाबरोबरच मध्य व पश्चिम रेल्वे कडून कोकण व गोव्यासाठी गणेशोत्सव विशेष जादा गाड्या चालविल्या जातात. या गाड्यांची घोषणा संबधित विभागकडून वेळोवेळी होत असते. कोकणवासीय प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या घोषणेकडे लक्ष ठेवून त्या नुसार आपले आरक्षण तात्काळ घेणे आवश्यक आहे.
सर्व प्रवाशांनी आपल्या प्रवासाच्या नियोजनानुसार वरील तारखा लक्षात घेऊन वेळेत आपले रेल्वे तिकीट आरक्षित करावे, जेणेकरून ऐन वेळेची धावपळ टाळता येईल. गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणार्यांची संख्या मोठी असल्याने लवकर आरक्षण करणे हिताचे ठरणार आहे. असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनने केलेे आहे.