परिवहनच्या वातानुकूलित बसेसचे तिकिट दर कमी केल्याने प्रवाशांनी मानले महापालिकेचे आभार
ठाणे : शहरातील नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी ठाणे महानगरपालिकेची ठाणे परिवहन सेवा कार्यरत आहे. ही सेवा अधिक सक्षम व्हावी व प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी व सुखकर व्हावा यासाठी परिवहनच्या ताफ्यात वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. प्रवाशांना या बससेवेचा फायदा घ्यावा व ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला परवडणारी असावी यासाठी वातानुकूलित बससेवेचे दर कमी करण्याचा निर्णय परिवहन समिती तसेच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आहे. परिवहन सेवा अधिक स्वस्त आणि सुविधाजनक झाली असल्याने परिवहन बसेसचा वापर वाढेल असा विश्वासही आयुक्तांनी व्यक्त केला.
ठाणे परिवहन सेवेतर्फे व्होल्व्हो वातानुकूलित बसेस या बोरीवली मार्गावर सुरू आहे. सुरूवातीच्या प्रवासापासून 2 किलोमीटरपर्यत परिवहनच्या व्होल्व्हो बसेसच भाडे हे 20.00 रु. इतके आकारले जात होते. तर याच मार्गावर बेस्टचे भाडे 6.00 रु. तर एनएमएमटीचे भाडे 10.00 रु. इतके आकारले जात होते. ठाणे परिवहन सेवेच्या बसेसने जास्तीत जास्त प्रवाशांनी प्रवास करावा या दृष्टीने भाड्याच्या दरात कपात करण्यात आली असून नवीन 2 किलोमीटरसाठी 10.00 रुपये इतके तिकिट आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याप्रमाणे प्रत्येक 2 किलोमीटरमागे प्रवासभाड्यात कपात करुन 40 किलोमीटरच्या प्रवासासाठी यापूर्वी 105.00 रुपये मोजावे लागत होते, परंतु नवीन दरानुसार हेच भाडे 65.00 रुपये इतके आकारले जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा प्रवास कमी दरामध्ये सुखकर होण्यास मदत होणार आहे असे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी परिवहन सेवेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बसेस चालविण्यात येणार आहेत, यामध्ये आगामी काळात 123 बसेस परिवहनसेवेच्या ताफ्यात दाखल होणार असून 45 स्टॅण्डर्ड बसेस व 16 मिडी बसेस अशा एकूण 71 वातानुकूलित बसेस तसेच 10 स्टॅण्डर्ड बसेस व 42 मिडी बसेस अशा एकूण 52 सर्वसाधारण बसेस टप्याटप्याने दाखल होणार आहेत. वातानुकूलित 26 मिडी बसेस व शहरातंर्गत उर्वरित 45 स्टॅण्डर्ड बसेस ठाणे शहराबाहेर दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर उदा. घाटकोपर, नवीमुंबई, पनवेल आदी मार्गावर चालविण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
इलेक्ट्रिक बसेस आल्यामुळे जुन्या झालेल्या डिझेल बसेस निकाली काढणे शक्य होईल, त्यामुळे परिवहन सेवेला होणारा तोटा कमी करणे शक्य होईल. तसेच इलेक्ट्रिक बसच्या माध्यमातून नवीन बसेस येत असल्यामुळे नागरिकांनाही सुखकारक प्रवास उपलब्ध करुन देणे शक्य झाले आहे. भविष्यामध्ये अधिक गर्दीच्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याकडे परिवहन सेवेचा भर असेल. परिवहन सेवेच्या उपक्रमाच्या बसेसचा अधिकाधिक वापर करण्यावर नागरिकांना प्रोत्साहन मिळेल अशा पध्दतीने धोरणात्मक बदल केले जातील असेही आयुक्त श्री. बांगर यांनी नमूद केले.
परिवहन सेवेचा प्रवास ठाणेकरांना स्वस्त व परवडणारा व्हावा यासाठी तिकिट दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे, तरी ठाणेकर नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे