मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बोलावलेल्या बैठकीला हजर राहिलेल्या ४ आमदारांनी अजित पवारांची नुकतीच भेट घेतली आहे. या भेटीमुळे हे चारही आमदार अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या नव्या गटात जाण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे पक्षातील पडझड थांबवण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करणा-या शरद पवारांना मोठा फटका बसणार आहे.
माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, हडपसरचे आमदार चेतन तुपे व विक्रमगढचे आमदार सुनील भुसारा आणि विदर्भातील राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांसोबत राहणार असल्याचे ठामपणे सांगितले होते. मात्र हे चौघेही वैयक्तिक कारणामुळे शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीला उपस्थित होते. पण आता त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
राजेश टोपे व सुनील भुसारा यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन अजित पवारांची भेट घेतली तर आमदार चेतन तुपे, राजेंद्र शिंगणे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीत सरकारमध्ये सहभागी होण्याच्या मुद्यावर अजित पवारांनी त्यांना काही आश्वासन दिले का, यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्धार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकेक आमदार अजित पवारांना जावून मिळत असताना शरद पवारांनी राज्यभर फिरून नव्या दमाने पक्षाची बांधणी करण्याचा संकल्प केला आहे.