
पिंपरी ( पुणे ) :- भाजी मंडईमध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे स्वयंपाक घरातून गायब झालेला टोमॅटो आता उपलब्ध झाला आहे. मात्र आलं आणि लसणाचे दर आवाक्याबाहेरच आहेत. तर, पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण होऊन, कोथिंबिरीच्या जुडीची विक्री पाच रुपयाला आहे. तसेच श्रावण सोमवार असल्याने काकडी, बटाटा, श्रावणी घेवडा यांना अधिक मागणी असल्याचे दिसून आले.
भाजी मंडईमधील किरकोळ बाजारात १५० ते २०० रुपये असलेले टोमॅटोचे दर गेल्या आठवड्यापासून घटले असून, चाळीस ते पन्नास रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर आलं-लसूण प्रत्येकी प्रतिकिलो अडीचशे रुपये दराने विक्री होत आहेत. त्यामुळे यांची खरेदी करणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर होऊन गेले. तर, कांदा आणि बटाट्याचे दरही कासव गतीने वाढत असल्याचे चित्र बाजारात दिसून आले. पालक, मेथी, मुळा, पुदीना जुडी प्रत्येकी दहा रुपये दराने विक्री होत आहे.
घाऊक बाजारातील प्रतिकिलो दर ः आलं ९०, लसून ९५ , हिरवी मिरची ३५ ते ४० , कोबी १० ते १२ , टोमॅटो १५ ते २० , कांदा १५ ते २० , बटाटा १५ ते १७ , भेंडी ३५ ते ४० , मटार ४० रुपये दराने विक्री होत आहे.
जाहिरात



