
संसदेत बुधवारी दोन तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा 9 वा दिवस आहे. आज काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे.
नवी दिल्ली- बुधवारी संसदेच्या सभागृहात दोन घुसखोर घुसल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधक चांगलेच आक्रमक झाले. आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 9 वा दिवस असून आज देखील संसदेत मोठा गदारोळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी कतारमध्ये अडकलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना कधी परत आणणार, यावरुन लोकसभेत स्थगन प्रस्ताव दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मांडणार दोन विधेयक…
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे केंद्रशासित प्रदेश सरकार ( दुरुस्ती ) विधेयक 2023 हे राज्यसभेत मांडणार आहेत. हे विधेयक अगोदर लोकसभेत पारित झालं आहे. गृहमंत्री अमित शाह हे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना ( दुसरी दुरुस्ती ) विधेयक 2023 हे विधेयक देखील सादर करणार आहेत. हे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आलं होतं. त्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन या देखील दोन विधेयक सादर करणार आहेत.
काँग्रेस खासदार मनीष तिवारींनी दिला स्थगन प्रस्ताव…
भारतीय नौदलाचे आठ माजी अधिकारी कतारमध्ये अडकले आहेत. त्यांना कतारनं फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या अधिकाऱ्यांना भारतात परत आणण्यासाठी संसदेत चर्चा करावी, याबाबत काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी स्थगन प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे कतारमध्ये अडकलेल्या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांवरुन आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चांगलंच रणकंदन होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बुधवारी संसदेत घुसले होते घुसखोर…
बुधवारी संसदेत दोन घुसखोर घुसल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. यातील अमोल शिंदे हा एक तरुण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे. या तरुणांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं अटक केली आहे. त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण गुरुग्राममध्ये थांबलेल्या विकी शर्मा याच्या घरीही दिल्ली पोलिसांनी छापेमारी केली. पोलिसांनी विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतलं आहे.