शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन; शिंदे गटाकडून शक्तीप्रदर्शनाची तयारी, तर सामनातून शिंदेंवर हल्लाबोल

Spread the love

मुंबई : शिवसेनेचा आज ५७ वा वर्धापनदिन आहे. सेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन वर्धापन दिन साजरे करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये भव्य मेळावा आयोजित केला आहे, तर ठाकरे गटाचा मेळावा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. दोन्ही कार्यक्रमांसाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सेनेच्या वर्धापनदिनी सामनातील अग्रलेखात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोल्ह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार, अशा शब्दांत सामनातून शिंदेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

अग्रलेखात नेमकं काय लिहिलंय?

शिवसेना ही मर्द मावळ्यांची भगवद्गीता आहे. आज बाळासाहेब शरीराने आपल्यात नाहीत. पण त्यांचा अंगारी विचार हाच आपला अग्निपथ आहे. खरी शिवसेना तीच, जिच्या पोटात एक ओठात दुसरे नाही. इथे सकाळी निष्ठेच्या आणाभाका घ्यायच्या व रात्रीच्या अंधारात सुरतचा ढोकळा खायला पळून जायचे हे दळभद्री उद्योग शिवसेनेच्या रक्तात नाहीत. शिवसेना 57 वर्षांची झाली व तिची घोडदौड यापुढेही सुरूच राहील ती याच प्रामाणिकपणामुळे. मग कितीही मांजरे आडवी येऊ द्या!

प्रतिशिवसेना स्थापणारे काळाच्या ओघात नष्ट होतील

शिवसेना 57 वर्षांची झाली हा एक चमत्कार म्हणावा लागेल. स्थापनेपासून शिवसेना संकटाचा आणि फाटाफुटीचा सामना करीत आहे; पण कोणी कितीही बेइमानी केली तरी ‘सामना’ शिवसेनाच जिंकत आली व सर्व महाराष्ट्रद्रोही कचरा उडावा तसे उडून गेले. हा आजचा वर्धापन दिन खासच म्हणावा लागेल. वर्षभरापूर्वी याच काळी शिवसेनेतील ४० बेइमानांनी आईच्या दुधाशी गद्दारी केली. ते भाजपास सामील झाले   आणि ‘आम्हीच खरी शिवसेना’ असे मिरवू लागले. अर्थात शिवसेनेच्या स्थापनेपासून असे प्रतिशिवसेना स्थापणारे आले आणि काळाच्या ओघात नष्ट झाले. 

सध्या राज्यात डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे 

महाराष्ट्राचा खरा वाघ आणि महाराष्ट्राशी बेइमानी करणारे ‘मिंधे’ वाघ यातील फरक जनता ओळखून आहे. डरकाळी फोडतो तो वाघ असतो आणि ओरडतो तो लांडगा. महाराष्ट्रात सध्या डरकाळीच्या नावाखाली गद्दार लांडग्यांचे पिचकणे सुरू आहे. असे अनेक कोल्हे-लांडगे मागील ५७ वर्षांत महाराष्ट्राच्या वाघाने शिकार करून फस्त केले आहेत. महाराष्ट्रात गेली ५७ वर्षे वाघाचीच डरकाळी घुमत आली आहे आणि घुमत राहणार आहे. महाराष्ट्रातील मिंध्या कोह्या-लांडग्यांचे केकाटणे वाघाच्या डरकाळीत विरून जाणार आहे. 

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page