
नाशिक (प्रतिनिधी): भक्तीला कर्मयोगाची जोड असेल तर भगवंत कृपा लवकर होते असे विचार श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे गुरुपुत्र युवासंत श्री. नितीनभाऊ मोरे यांनी मांडले. केंद्र सक्षमीकरण अभियानांतर्गत तुळजापूर येथील जिजामाता नगर सेवाकेंद्रात त्यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णांनी भगवद् गीतेत सांगितलेला ज्ञान ,भक्ती आणि कर्मयोग परमपूज्य गुरुमाऊली तमाम सेवेकऱ्यांकडून प्रत्यक्षात आचरणात आणतात. सेवामार्गाच्या विविध अमूल्य ग्रंथांमधून वेद, पुराण आणि उपनिषदांचे सारयुक्त ज्ञान प्रकाशित केले जाते. ही ज्ञानाची पाणपोई घरोघरी पोहोचविली जाते. हे ज्ञानदानाचे पवित्र कार्य सेवामार्गाकडून गेल्या सात दशकांपासून सुरू आहे. हा झाला ज्ञानयोग.. तर सेवामार्गाच्या विविध ग्रंथांचे पारायण आणि होणाऱ्या सेवांमधून भक्तीयोग साधला जातो. परमपूज्य गुरुमाऊलींनी कर्मकांड आणि अंधश्रद्धेला थारा न देता सहज सोपी भक्ती सेवेकऱ्यांना शिकविली.
हा भक्तियोग तमाम सेवेकरी आचरणात आणतात तर ग्राम आणि नागरी विकास अभियानाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्यक्रम तसेच विश्वशांती, राष्ट्र आणि समाजासाठी सेवेकरी बहुविध उपक्रम राबवतात. हा कर्मयोग साधला जातो. अशाप्रकारे ज्ञान, भक्ती आणि कर्मयोग सेवेकऱ्यांकडून आचरणात आणला जातो असे गुरुपुत्र श्री मोरे यांनी स्पष्ट केले.
मूल्यसंस्कार शिबीर आणि भागवत सप्ताह..
मुले हुशार होण्याबरोबरच सुसंस्कारित झाली पाहिजेत. …
मूल्यसंस्कारामुळे मुले चारित्र्यवान आणि कर्तृत्ववान घडतात. वाईट गोष्टींपासून दूर राहतात. व्यसनी होत नाहीत. गुन्हेगारीपासून चार हात लांब राहतात. मूल्यसंस्कारचे हे महत्व घराघरात समजावून सांगण्यासाठी सेवामार्गाचा बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभाग प्रयत्नशील आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून येत्या ८ जून २०२५ रोजी संपूर्ण देशभरामध्ये जिल्हा, तालुका आणि केंद्रस्तरावर एक दिवसीय मूल्यसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आपापल्या भागातील सेवाकेंद्रांमध्ये होणाऱ्या बालसंस्कार शिबिराला आपल्या मुलांना अवश्य पाठवा असे आवाहन गुरुपुत्र श्री मोरे यांनी केले.
परमपूज्य गुरुमाऊलींच्या पावन उपस्थितीत २७ जून ते ४ जुलै या काळात मथुरेत होणाऱ्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहामध्ये सर्वोच्च सेवा करण्याची अमूल्य संधी सेवेकऱ्यांना मिळाली आहे. तेव्हा ही संधी दवडू नका.
आपण सारे खूप भाग्यवान सेवेकरी आहोत. कारण परमपूज्य गुरुमाऊलीसारखे गुरु आपल्याला लाभले आहेत. तेव्हा गुरूंच्या परमपावन सान्निध्यात होणाऱ्या सर्वच सेवांमध्ये आवर्जून सहभागी व्हा असेही त्यांनी नमूद केले.